ॲड. धर्मपाल मेश्राम यांचे मनपा आयुक्त व जिल्हाधिकारी यांना पत्र
रेमडेसिवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजन सिलेंडरच्या तुटवड्याबाबत गंभीर दखल घेण्याची मागणी
नागपूर : शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच रुग्णालयात भरती असलेल्या व घरीच गृहविलगीकरणात असणार्या कोरोनाबाधित रुग्णांसाठी आवश्यक रेमडेसिवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजन सिलेंडरचा वाढता तुटवडा ही अत्यंत धोक्याची बाब आहे. रुग्णांसाठी आवश्यक दोन्ही महत्वाच्या बाबींचा होणारा काळाबाजार रोखून त्याचे वितरण सुरळीत व्हावे यासाठी प्रशासनाद्वारे वेगळी यंत्रणा निर्माण करण्यात यावी, अशी मागणी भाजपा प्रदेश सचिव ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी मनपा आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना केली आहे.
रेमडेसिवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजन सिलेंडरच्या काळाबाजारासंदर्भात ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. आणि जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना पत्र दिले आहे. पत्राद्वारे त्यांनी काळाबाजार करणा-यांवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसह काही महत्वाच्या सुचनाही केल्या आहेत.
कोरोना या वैश्विक महामारीच्या विरोधात लढून रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी संपूर्ण आरोग्य यंत्रणा अहोरात्र सेवाकार्य बजावत आहे. मात्र या संकटाच्या समयी सुद्धा काही लोक स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी इतरांचा जीव धोक्यात टाकत आहेत. आज शहरात रेमडेसिवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजन सिलेंडरचा मोठा तुटवडा निर्माण झालेला आहे. रुग्णांना मोठी रक्कम मागून ते पुरविणारी टोळी सक्रीय आहे. अशा स्थितीत प्रशासनाद्वारे कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.मात्र या कारवाई सोबतच या सर्व बाबींवर नियंत्रण आणून त्याचे वितरण सुरळीत व्हावे यासाठी वेगळी यंत्रणा निर्माण करणे गरजेचे आहे, असे सांगताना त्यांनी प्रशासनाला सुचनाही केली.
मनपाच्या दहाही झोनच्या सहायक आयुक्तांच्या नेतृत्वात झोनस्तरीय पथक निर्धारित करण्यात यावे व या पथकाला हॉस्पिटल आणि इंजेक्शन व ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा करणा-या आस्थापनांची चौकशी करण्याचे आदेश निर्गमित करण्यात यावे. काळाबाजार करणा-यांची तक्रार प्राप्त होताच तक्रारीवर तात्काळ दखल घेउन कारवाई केली जावी यासाठी या पथकाला संबंधित हॉस्पिटल किंवा आस्थापनांवर छापा टाकण्याचे अधिकार प्रदान करण्यात यावे. त्यामुळे पथक छापामारी करून संबंधितांचे स्टॉकबुक तपासेल व दोषींवर कारवाई केली जाईल. या प्रक्रियेमुळे काळाबाजारावर नियंत्रणही मिळविता येईल व इंजेक्शन आणि ऑक्सिजन सिलेंडरचे वितरणही सुरळीत होईल, असा विश्वास ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी व्यक्त केला.