Published On : Mon, May 4th, 2020

शासनाने कापूस खरेदी 15 दिवसात सुरु करावी : बावनकुळे

-शेतकरी अडचणीत, व्यापार्‍यांची लूटमार
-शेतकर्‍याच्या कापसाला 5500 रुपये भाव द्यावा

नागपूर: 4 मे विदर्भ, मराठवाड्यात यंदा कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले असताना शासनाने अजूनही कापूस खरेदी केंद्रे सुरु केले नाही. शासनाने येत्या 15 दिवसात शेतकर्‍याचा सर्वचा सर्व कापूस खरेदी करावा म्हणजे खरीप हंगामासाठी शेतकरी पुन्हा नवीन पिकाची तयारी करेल, अशी मागणी माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

यंदा कापसाचे उत्पादन चांगले झाले आहे. पण कापूस अजूनही शेतकर्‍याच्या घरातच पडून आहे. शासनाची कापूस खरेदी करण्यासाठी सुरू करण्याची महाराष्ट्र शासनाची जबााबदारी होती. प्रत्येक जिल्ह्यात काही प्रमाणात कापूस खरेदीसाठी केंद्र सुरु करायला हवे होते. पण शासनाने तसे केले नाही. काही केंद्र सुरु केले पण त्या केंद्रावर ग्रेडर नाही. शेतकर्‍यांना परत पाठविले जात आहे. शेतकर्‍यांना 5÷500 रुपये हमी भाव देत नाही. व्यापारी साडे तीन चार हजार रुपये क्विंटल कापूस खरेदी करून लूटमार करीत आहे, या स्थितीकडे बावनकुळे यांनी लक्ष वेधले आहे.

आता मे महिनाा सुरु आहे. जून महिन्यापासून पावसाचे वेध लागतील. नेहमीप्रमाणे मार्च महिन्याअखेरपर्यंत शेतकर्‍याचा सर्व कापूस खरेदी केला जातो. 10-15 टक्के कापूसच शिल्लक राहात असावा. यंदा मात्र मे सुरु झाला तरी कापूस खरेदी केंद्रे सुरु झाली नाही. शेतकरी अजूनही आपला कापूस विकू शकला नाही. एकीकडे शेतकर्‍याला 5500 हमी भाव मिळत नाही. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍याला व्यापार्‍याला बेभाव कापूस विकावा लागत आहे. यासाठी सर्वस्वी शासनच जबाबदार आहे. महसूल मंडळानुसार कापूस खरेदी केंद्रे सुरु केली असती तर शेतकरी कापूस विकू शकला असता आणि कोरोनाच्या संचारबंदीत शेतकर्‍याला आर्थिक दिलासा मिळाला असता.

येत्या 15 दिवसात शासनाने शेतकर्‍याचा संपूर्ण कापूस खरेदी करून शेतकर्‍याला अडचणीतून सोडवावे. कापूस खरेदीच्या बाबतीत शेतकरी वार्‍यावर सोडला गेला आहे. कोरोना संचारबंदीतही सोशल डिस्टसिंग, मास्क, सॅनिटायजर आदींचा वापर करून आणि कोरोना प्रतिबंधक सर्व नियम पाळून शेतकर्‍यासाठी खरेदी केंद्रे सुरु करायला हवी होती.शासनाने महसूल मंडळात आताही यंत्रणा उभारावी व 5500 रुपये कापसाला भाव देऊन खरेदी करावी असेही बावनकुळे यांनी म्हटले आहे.