Published On : Thu, Oct 14th, 2021

दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांच्या सुविधेसाठी मनपा सज्ज : महापौर दयाशंकर तिवारी

नियमांचे पालन करा, मनपाला सहकार्य करा ; नियंत्रण कक्ष, सहा लसीकरण केंद्र, पिण्याचे पाणी, शौचालयाची व्यवस्था

नागपूर : येत्या १४ व १५ ऑक्टोबर रोजी दीक्षाभूमीवर कोव्हिड नियमांच्या पालनासह धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने दीक्षाभूमीवर येणाऱ्या बौद्ध अनुयायांच्या सुविधेच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेच्या वतीने सर्व तयारी पूर्ण झालेली असून अनुयायांना कुठल्याही प्रकारची गैरसोय होउ नये यासाठी नागपूर महानगरपालिका सज्ज आहे. दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांनीही आपल्याकडून कुठल्याही प्रकारे नियमांचे भंग होउ नये याची काळजी घेत स्वत:सह इतरांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षा बाळगावी, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले आहे.

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर येणाऱ्या बौद्ध अनुयायांच्या सुविधेसाठी मनपातर्फे साहित्यभूषण अण्णाभाउ साठे स्मारकाजवळ मनपाचे नियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहे. याशिवाय मनपाद्वारे दीक्षाभूमीकडे येणाऱ्या मार्गांवर सहा लसीकरण केंद्र सुद्धा सुरू करण्यात आले आहेत. बुधवारी (ता.१३) महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते नियंत्रण कक्षासह सहाही लसीकरण केंद्रांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी उपायुक्त मिलींद मेश्राम, लक्ष्मीनगर झोनचे सहायक आयुक्त गणेश राठोड, कार्यकारी अभियंता विजय गुरूबक्षाणी, झोनल वैद्यकीय अधिकारी तथा दीक्षाभूमीवरील आरोग्य व्यवस्थेचे नोडल अधिकारी डॉ.सुनील कांबळे, उपअभियंता अनिल गेडाम, स्वच्छता अधिकारी रामभाउ तिडके, आरोग्य व्यवस्थेच्या समन्वयक डॉ.सरोज कुथे पाटील, सहायक अधीक्षक धनंजय जाधव आदी उपस्थित होते.

यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी मनपाच्या संपूर्ण व्यवस्थेचा आढावा घेतला. लसीकरण केंद्रांवर झालेल्या लसीकरण व आरोग्य तपासणीचा सुद्धा आढावा घेतला. दीक्षाभूमीवर येणा-या बौद्ध बांधवांच्या सुविधेसाठी नागपूर महानगरपालिकचे २०० कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने दीक्षाभूमीवर येणाऱ्या बौद्ध अनुयायांची सुविधा आणि सुरक्षेच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिका आणि पोलिस प्रशासन अहोरात्र कार्य करते. येथे येणाऱ्या अनुयायांना कुठलीही असुविधा होउ नये, परिसरात स्वच्छता रहावी, कुणाला मदत हवी असल्यास ती वेळेवर मिळावी, आरोग्याच्या दृष्टीने तपासणी करून त्वरीत प्रथमोपचार मिळावा यासाठी मनपाच्या स्वच्छता आणि आरोग्य कर्मचा-यांनी तत्परतेने कार्य करावे. आपल्या शहरात येणाऱ्या नागरिकांच्या सेवेसाठी मिळालेल्या संधीला आशीर्वाद मानून काम करावे, असे आवाहनही महापौरांनी यावेळी केले.

विविध प्रवेश मार्गावर सहा लसीकरण केंद्र
दीक्षाभूमीवर येणाऱ्या बौद्ध अनुयायांसाठी कोव्हिड लसीकरणाचे दोन डोज घेणे अत्यावश्यक आहे. ज्यांनी लसीकरणाचा एक डोज घेतला आहे व दुसरा डोज घेण्याचा अवधी पूर्ण झालेला आहे. अशांसाठी दीक्षाभूमीच्या परिसरात लसीकरण केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. साहित्यभूषण अण्णाभाउ साठे चौकामध्ये मनपाच्या नियंत्रण कक्षामध्येच एक लसीकरण केंद्र असून रहाटे कॉलनी चौक, काछीपूरा चौक, बजाजनगर चौक, लक्ष्मीनगर चौक आणि नीरी मार्ग अशा एकूण सहा ठिकाणी लसीकरण केंद्र उभारण्यात आलेली आहेत. दीक्षाभूमीकडे येणाऱ्या मार्गावर ही सर्व लसीकरण केंद्र असून येथे आधी अनुयांना थांबवून त्यांचे लसीकरण प्रमाणपत्र तपासले जाणार आहे. जे दुसरा डोज घेण्यासाठी पात्र आहेत त्यांना लगेच दुसरा डोज देउन प्रवेश देण्यात येईल.

एक डोज घेतलेल्यांना चाचणीनंतरच प्रवेश
ज्या अनुयायांचे लसीकरणाचे दोन्ही डोज पूर्ण झालेले नाही. त्यांच्यासाठी मनपाद्वारे चाचणीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. लसीकरण केंद्रांवरच लसीकरणाचा एक डोज घेतलेल्यांची कोरोना अँटेजेन चाचणी करण्यात येईल. ज्यांचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त होईल, त्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. याशिवाय लसीकरण केंद्रांवर नागरिकांची आरोग्य तपासणी सुद्धा करण्यात येणार असून आवश्यक औषधोपचार सुद्धा करण्यात येणार आहे.

१०० ठिकाणी पाण्याचे नळ
दीक्षाभूमी मार्गावर अनुयायांच्या सुविधेच्या दृष्टीने मनपातर्फे १०० ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी तात्पुरती नळ व्यवस्था उभारण्यात आली आहे. याशिवाय नागरिकांच्या सुविधेसाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वसतीगृहानजीच्या मोकळ्या जागेमध्ये शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. मनपातर्फे या परिसरामध्ये ५०० तात्पुरती शौचालये उभारण्यात आलेली आहेत.