नागपूर : नागपूर महानगरपालिका निवडणूक–२०२६च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने मैदानात उतरला असून, शहरातील सर्व १५१ प्रभागांत उमेदवार उभे करण्यात आले आहेत. नागरिकांचा आशीर्वाद हाच आपला खरा बळकटीचा आधार असल्याचे सांगत, काँग्रेसने यंदाच्या निवडणुकीत किमान १०० नगरसेवक निवडून आणण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला आहे. गेल्या जवळपास दोन दशकांपासून शहरावर सत्ताधारी असलेल्या भाजपच्या अपयशी, भ्रष्ट आणि जनविरोधी कारभारामुळे नागपूरकर वैतागले असून, आता शहरात बदलाची हवा वाहत असल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात ही भूमिका स्पष्ट केली. कोविड-१९सारख्या अभूतपूर्व संकटाच्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या मदतीसाठी धावून गेलेले, रुग्ण, त्यांचे नातेवाईक, तसेच गरीब आणि गरजू घटकांसाठी सातत्याने कार्य करणारे कार्यकर्तेच उमेदवार म्हणून निवडले असल्याचे त्यांनी नमूद केले. आपल्या प्रभागातील प्रत्येक घटकाच्या समस्या समजून घेऊन त्यावर उपाय शोधण्यासाठी झटणाऱ्या तळागाळातील कार्यकर्त्यांनाच काँग्रेसने संधी दिली असल्याचा दावाही त्यांनी केला.
हे उमेदवार केवळ निवडणुकीच्या काळापुरते सक्रिय नसून, वर्षानुवर्षे नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी राहिलेले आहेत, असा विश्वास काँग्रेस नेतृत्वाने व्यक्त केला आहे. त्यामुळे नागपूरकर नक्कीच या उमेदवारांना भरभरून पाठिंबा देतील आणि शहराच्या विकासाची जबाबदारी काँग्रेसच्या हाती देतील, असा विश्वासही पक्षाकडून व्यक्त करण्यात आला आहे.








