राष्ट्रीय सोशल मीडिया नवसंकल्प शिबीर संपन्न
नागपूर : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागाच्या वतीने राष्ट्रीय नवसंकल्प शिबीर आज वाडी – हिंगणा रोडवरील सॉलिटिअर बँकेट हॉलमध्ये आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, माजी केंद्रीय मंत्री विलासराव मुत्तेमवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, आमदार विकास ठाकरे, आमदार अभिजित वंजारी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सोशल मीडिया प्रमुख रोहन गुप्ता, काँग्रेस प्रवक्त्या अलका लांबा, प्रवक्ते पवन खेरा, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सोशल मीडिया विभाग अध्यक्ष विशाल मुत्तेमवार यांची उपस्थिती होती.
प्रत्येक जिल्ह्यात सोशल मीडिया वॉर स्थापन करून सोशल मीडिया विभागाचा विस्तार करण्याचा संकल्प नाना पटोले यांनी केला. तर सोशल मीडिया हे भाषण देण्याचे व्यासपीठ नसून आपसातील मतभेद विसरून एकजूट लढा देण्याचा मनोदय यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला. देशात विविध समुदायांमध्ये फूट पाडणाऱ्या अराजक शक्तीचा पायबंद घालण्यासाठी आमचे सोशल मीडिया सेल सक्षम असल्याचे पवन खेरा म्हणाले.
तळागाळापर्यंत सोशल मीडियाचे महत्व पटवून देण्याची गरज रोहन गुप्ता यांनी व्यक्त केली. सत्याच्या लढ्यासाठी सर्वांची तुरुंगात जाण्याची तयारी असली पाहिजे, असे अलका लांबा म्हणाल्या. सोशल मीडियाचा सुयोग्य वापर करून आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांना पंतप्रधानपदी विराजमान करण्याचा निर्धार विशाल मुत्तेमवार यांनी व्यक्त केला.
शिबिराला राष्ट्रीय स्वयंसेवक हसिबा अमीन, नितीन अग्रवाल, रुचिरा चतुर्वेदी, विजयानंद पोल, ज्ञानेश्वर चव्हाण, बिलाल अहमद आदी कार्यकर्ते उपस्थित होते.