Published On : Thu, Apr 12th, 2018

शंकर चायरे यांच्या आत्महत्येप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गुन्हा दाखल करण्याच्या कुटुंबियांच्या मागणीला काँग्रेसचा पाठिंबाः अशोक चव्हाण


मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार धरून यवतमाळ जिल्ह्यातील राजूरवाडी येथील शेतकरी शंकर चायरे यांनी मंगळवारी आत्महत्या केली. ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी लांछनास्पद बाब आहे. चायरे कुटुंबियांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. काँग्रेस पक्षाचा त्यांच्या मागणीला पाठिंबा आहे. कुटुंबियांच्या मागणी प्रमाणे चायरे यांच्या आत्महत्येप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

या संदर्भात पत्रकारांशी बोलताना खा. चव्हाण म्हणाले की, या अगोदर सात महिन्यांपूर्वी यवतमाळमध्ये चायरे यांच्या राजूरवाडी गावापासून ३ किमी अंतरावर असलेल्या टिटवी गावातील प्रकाश मानगावकर या शेतक-याने आत्महत्या केली होती. एका झाडाच्या पानावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी मोदींचे नाव लिहून आपली जीवनयात्रा संपली होती. भाजपच्या सत्ताकाळात राज्यात 13 हजारांपेक्षा अधिक शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. या अगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन राज्यातील अनेक शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. परंतु यवतमाळमध्ये ज्या ठिकाणी ‘चाय पे चर्चा’ या कार्यक्रमाद्वारे मोदीजींनी 2014 साली आपल्या प्रचाराची आणि देशाला दिलेल्या आश्वासनांची सुरुवात केली. त्याच यवतमाळ जिल्ह्यात दोन शेतकरी पंतप्रधानांचे नाव सुसाईड नोटमध्ये लिहून आत्महत्या करतात हे दुर्देवाचे आहे. मोदीजी उपोषण करित असताना आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या कुटुंबियांकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होते हा देशातील खरा विरोधाभास आहे असे खा. चव्हाण म्हणाले.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमात शेतक-यांसमोर नरेंद्र मोदींनी नितीन गडकरी यांना शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी एकात्मिक उपाययोजना (Integrated Solution) आराखडा तायर करण्याचे निर्देश दिले होते. त्याचे काय झाले? ते अद्यापही समजले नाही. कर्जमाफी, नविन कर्ज, कापूस व सोयाबीनला किमान आधारभूत किंमत, कृषी व जलसंधारणासाठी नविन तंत्रज्ञान, शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारीत दीडपट भाव ही सगळी ‘चाय पे चर्चा’ या कार्यक्रमात दिलेली आश्वासने जुमले ठरली आहेत.

गेले तीन दिवस चायरे कुटुंबियांनी शंकर चायरे यांचा मृतदेह ताब्यात घेतला गेला नाही. सरकारतर्फे किशोर तिवारी यांनी पाठवण्यात आले होते पण गावक-यांनी त्यांना पिटाळून लावले. या अगोदरही प्रकाश मानगावकर यांच्या आत्महत्या प्रकरणात हेच किशोर तिवारी सरकारचे प्रतिनिधी म्हणून मानगावकर यांच्या कुटुंबियांना भेटून त्यांच्या पत्नीला नोकरी, मुलांचे शिक्षणासाठी मदत इत्यादी आश्वासने देऊन आले होते मात्र त्यानंतर सरकारने ही शेतकरी आत्महत्या मानण्यासच नकार दिला.

गेल्या दोन दिवसात राज्य सरकारकडून किमान पालकमंत्र्यांनी तरी चायरे कुटुंबियांची भेट घ्यायला हवी होती. पण सरकारकडे ती संवेदनशीलता ही राहिली नाही. शेतक-यांच्या मृतदेहाच्या विटंबनेला सरकार जबाबदार आहे असे खा. चव्हाण म्हणाले.

आज ट्वीटरवर #GOBACKMODI हा हॅशटॅग देशपातळीवर पहिल्या क्रमांकावर आहे. तामिळनाडूतील जनतेला तोंड दाखवायला मोदींना भीती वाटत आहे. ज्या पध्दतीने एका राज्याची संपूर्ण जनता एकत्र येऊन पंतप्रधानांना काळे झेंडे दाखवत आहे, अशी घटना देशाच्या इतिहासात याआधी कधी घडली नाही. आज देशाच्या जनतेला सामोरे जाण्याचे धारिष्ट्य पंतप्रधान मोदींकडे नाही हे त्यांनी तामिळनाडूच्या दौ-यात केलेल्या सुरक्षात्मक उपायांवरून स्पष्ट होते. देशाच्या संसदेत मोदी सरकारविरोधात अविश्वासाचा ठराव आला होता त्याला सामोरे जायचे धारिष्ट्यही पंतप्रधानांकडे नाही. त्यामुळे स्वतःच्या सहयोगी पक्षांकडून संसद बंद पाडून अविश्वासाच्या ठरावापासून पळ काढण्याचा प्रयत्न मोदी यांनी केला आहे.

संसद चालवायची जबाबदारी सरकारची असते असे विरोधी पक्षात असताना अरूण जेटली स्वतः म्हणाले होते. आज मोदींना त्यांच्या वक्तव्याचा सोयीस्कर पणे विसर पडला आहे. देशपातळीवर मोदींचा प्रचंड विरोध होत आहे. केंद्रातले सरकार सर्वच आघाड्यांवर सरकार नापास झाले आहे. त्यामुळे जनतेमध्ये प्रचंड असंतोष असून शेतक-यांसहित समाजातील सर्व वर्ग रस्त्यावर उतरले आहेत. अशावेळी उपोषणाचे नाटक करून चालणार नाही. पुण्यातील भाजपच्या आमदारांनी उपोषणावेळी नाश्ता करून आणि स्वतः पंतप्रधानांच्या दौ-यात उपोषणासाठी जाताना व उपोषणावरून परत येताना नाश्त्यासाठी केलेल्या व्यवस्थेवरून मोदींचे उपोषण हे ढोंग आहे हे स्पष्ट झाले आहे, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी लगावला.