चंद्रपूर : काँग्रेसमधील अंतर्गत वाद आणि चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तास्थापनेच्या कोंडीवरून भाजप आमदार परिणय फुके यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. महापालिकेत सर्वाधिक जागा मिळवूनही सत्ता स्थापन करण्यात अपयश आल्याने काँग्रेसची अवस्था ‘नाचता येईना अंगण वाकडं’ अशी झाल्याचा टोला त्यांनी लगावला.
चंद्रपूर महापालिकेत काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी सत्ता काबीज करण्यात त्यांना अपयश आले आहे. यावर प्रतिक्रिया देताना फुके म्हणाले की, मोठा पक्ष असूनही सत्ता स्थापन करता न येणे हे काँग्रेसच्या नेतृत्वाचे अपयश आहे.
वडेट्टीवार ना पक्षातील वरिष्ठांचे ऐकतात, ना नगरसेवक त्यांच्यावर विश्वास ठेवतात, त्यामुळेच हा पेच निर्माण झाला आहे.
विरोधकांना सगळीकडे भाजपच दिसतो काँग्रेसच्या अपयशावर बोट ठेवताना फुकेंनी खोचक शब्दांत टीका केली. निवडणुकीत पराभव झाला की ईव्हीएम किंवा भाजपला दोष देणे, ही काँग्रेसची सवय बनली आहे. त्यांच्या घरात काही घडलं तरी त्यामागे भाजपच आहे, असा संशय विरोधकांना येतो; इतपत त्यांची मानसिकता पोहोचली आहे, असेही ते म्हणाले.
चंद्रपुरात भाजपचाच महापौर – फुकेंचा दावा चंद्रपूरच्या राजकारणावर भाष्य करताना फुके यांनी ठामपणे सांगितले की, महापालिकेत भाजपचीच सत्ता येणार असून भाजपचाच महापौर होईल. काँग्रेसमधील गटबाजीमुळे काही नगरसेवक स्थिर सरकारसाठी भाजपच्या संपर्कात येऊ शकतात, असे सूचक विधानही त्यांनी केले.
शरद पवारांबाबत सूचक भाष्य-
महाविकास आघाडीच्या भवितव्यावर बोलताना फुके म्हणाले की, ही आघाडी आता बुडत्या जहाजासारखी झाली आहे. शरद पवार हे अनुभवी आणि दूरदृष्टी असलेले नेते असून, अशा परिस्थितीत ते फार काळ या आघाडीत राहतील असे वाटत नाही. भविष्यात परिस्थितीनुसार ते महायुतीकडे वाटचाल करतील, अशी शक्यता नाकारता येत नाही, असे त्यांनी नमूद केले.
भुजबळांच्या क्लीन चिटवर खुलासा छगन भुजबळ यांना मिळालेल्या क्लीन चिटवर होणाऱ्या आरोपांनाही फुकेंनी उत्तर दिले. ही क्लीन चिट भाजप किंवा सरकारने नव्हे, तर न्यायालयाने दिली आहे. पुराव्यांच्या अभावामुळे न्यायालयाने निर्णय दिला असून, त्यात कोणताही राजकीय हस्तक्षेप नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.









