Published On : Mon, Aug 14th, 2017

सच्चा काँग्रेस कार्यकर्ता काळाच्या पडद्याआड गेला !


मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव संजय चौपाने यांच्या निधनाने सच्चा काँग्रेस कार्यकर्ता काळाच्या पडद्याआड गेला, या शब्दात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी शोक व्यक्त केला आहे.

संजय चौपाने यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना ते म्हणाले की, संजय चौपाने यांनी विद्यार्थी चळवळीतून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया, युवक काँग्रेस आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव म्हणून काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. काँग्रेस पक्ष हेच आपले कुटुंब आहे या भावनेने ते आयुष्यभर काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले. काँग्रेस विचारांचा सच्चा पाईक असणा-या संजय चौपाने यांच्या अपघाती मृत्यूने वैयक्तिक माझी व काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली आहे.

संजय चौपाने यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चौपाने कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे खा. अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.