नागपूर : काँग्रेस नेते रवींद्र उर्फ छोटू भोयर यांना साडेतीन कोटींच्या गुंतवणूक प्रकरणात अटक करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी (दि.२२) सकाळी रेशीमबाग येथील घरातून त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने त्यांना २५ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
रवींद्र भोयर हे २०१९ मध्ये पुनम अर्बन क्रेडीट को ऑप. सोसायटीत संचालक असताना त्यांनी ग्राहकांना भरघोस लाभ आणि परताव्याचे आमिष देत गुंतवणूक करण्यास भाग पाडले.
जवळपास शंभराच्यावर ग्राहकांनी तीन कोटी ४१ लाख रुपये गुंतविले. बराच कालावधी लोटल्यानंतरही त्यांना परतावा मिळाला नाही. अखेर विचारपूस करण्यासाठी आलेल्या ग्राहकांना ठोस उत्तर मिळत नसल्याने त्रस्त ग्राहकांनी पोलिसांकडे धाव घेतली.
पोलिसांनी गुन्हा नोंदवून संचालक मंडळातील सदस्यांना अटक केली. यापुर्वी दहा आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यानंतर बुधवारी (दि.२२) सकाळी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणाचा सखोल तपास करत रवींद्र भोयर यांना अटक केली.