नागपूर :काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी सोमवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची त्यांच्या कोराडी येथील निवास्थानी भेट घेतली. या भेटीनंतर देशमुख यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा पुन्हा सुरु झाल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी देशमुख यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात विधान केले होते. त्यानंतर काँग्रेसने देशमुख यांच्या विरोधात कारवाईचा बडगा उचलत त्यांना नोटीस पाटवली होती. याला त्यांनी उत्तरही दिले होते. त्यानंतर अद्यापही काँग्रेस पक्षाकडून त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. तत्पूर्वी देशमुख यांनी बावनकुळे यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
देशमुख यांनी बावनकुळे यांच्याकडे ब्रेकफास्ट करण्यासाठी आलो होतो. कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे प्रसार माध्यमांना म्हणाले. देशमुख हे आज सकाळी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी येथील कार्यालयात दाखल झाले. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकत्र बसून चहा घेत चर्चाही केली. आशिष देशमुख हे बावनकुळे यांच्या कार्यालयात तब्बल अर्धा ते पाऊणतास खलबतं झाल्याची माहिती आहे.
आगामी निवडणुकीसाठी सावनेर आणि काटोलमध्ये भाजपला तगडा उमेदवार हवा आहे. आशिष देशमुख हे भाजपसाठी ताकदीचे उमेदवार ठरू शकतात. त्या अनुषंगाने दोन्ही नेत्यांमधील भेटीला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहेत. या भेटीमुळे देशमुख लवकरच काँग्रेसची साथ सोडून भाजपचे कमळ हाती घेऊ शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.