
झोननिहाय चित्र स्पष्ट-
काँग्रेसचा प्रभाव काही मोजक्या भागांपुरताच मर्यादित राहिल्याचे झोननिहाय निकालातून स्पष्ट होते.
काँग्रेसचा झोननिहाय निकाल (एकूण ३४ जागा):
पश्चिम नागपूर – १२
उत्तर नागपूर – ८
दक्षिण नागपूर – ६
मध्य नागपूर – ५
दक्षिण-पश्चिम – २
पूर्व नागपूर – १
या आकडेवारीवरून काँग्रेसचा पारंपरिक प्रभाव असलेले भाग वगळता शहराच्या बहुतांश भागात पक्ष निष्प्रभ ठरल्याचे चित्र दिसून येते.
मोठे नेते प्रचारातून ‘गायब’-नागपूरसारख्या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या शहरात काँग्रेसचे अनेक बडे नेते प्रत्यक्ष प्रचारात फारसे दिसले नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अपेक्षित उत्साह निर्माण होऊ शकला नाही.
राजकीय वर्तुळात चर्चा आहे की, “जर वरिष्ठ नेत्यांनी नागपूरमध्ये ठाण मांडून प्रचार केला असता, तर निकालाचे चित्र वेगळे असू शकले असते.”
आमदार असूनही शहरव्यापी प्रभाव नाही-
काँग्रेसकडे शहरात अनेक आमदार आणि बडे प्रभावी नेते असतानाही त्याचा संघटित फायदा पक्षाला मिळू शकला नाही. पश्चिम नागपूर – आमदार विकास ठाकरे
उत्तर नागपूर – आमदार नितीन राऊत
दक्षिण नागपूर – गिरीश पांडव, अभिजीत वंजारी
मध्य नागपूर – बंटी शेलके
स्थानिक काँग्रेस नेत्याचा प्रभाव काही प्रभागांपुरताच मर्यादित राहिला. शहरभर भाजपविरोधी वातावरण निर्माण करण्यात काँग्रेस अपयशी ठरली.
काँग्रेस कुठे कमी पडली?
या पराभवामागे काँग्रेसच्या अनेक रणनीतिक चुका कारणीभूत ठरल्या. महाविकास आघाडी अस्तित्वात असतानाही ‘स्वबळावर लढण्याचा’ घेतलेला हट्ट हा सर्वात मोठा राजकीय फटका ठरला. यामुळे भाजपविरोधी मते विभागली गेली आणि त्याचा थेट फायदा भाजपला झाला.
नेतृत्वाचा ठळक अभाव-
नागपूरसारख्या महत्त्वाच्या शहरात स्थानिक कार्यकर्त्यांना दिशा देणारे, जोश निर्माण करणारे ठोस नेतृत्व मैदानात दिसले नाही. परिणामी प्रचारात धार राहिली नाही.
विस्कळीत व उशिरा सुरू झालेला प्रचार-
भाजपने बूथ पातळीवर सूक्ष्म नियोजन करत मतदारांपर्यंत प्रभावी पोहोच साधली, तर काँग्रेसचा प्रचार उशिरा सुरू झालेला, विस्कळीत आणि दिशाहीन असल्याची भावना मतदारांमध्ये निर्माण झाली.
संघटनात्मक कमकुवतपणा उघड-
अंतर्गत मतभेद, समन्वयाचा अभाव आणि कार्यकर्त्यांमधील नाराजी याचा थेट परिणाम निकालावर झाला. काही पारंपरिक बालेकिल्ले टिकून राहिले, मात्र शहरव्यापी लाट उभी करण्यात काँग्रेस अपयशी ठरली.
आत्मपरीक्षणाची वेळ-
नागपूर मनपा निवडणुकीचा निकाल काँग्रेससाठी केवळ पराभव नसून रणनीती, नेतृत्व आणि संघटन रचनेत बदल करण्याचा स्पष्ट संदेश आहे. आगामी निवडणुकांत भाजपला प्रभावी टक्कर द्यायची असेल, तर काँग्रेसला एकत्रित आघाडी, ठोस नेतृत्व आणि आक्रमक, नियोजनबद्ध प्रचाराशिवाय पर्याय उरलेला नाही.








