नागपूर जिल्हा काँग्रेसमध्ये नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत कलह शिगेला पोहोचला आहे. उमेदवार निवडीवरून निर्माण झालेल्या वादामुळे पक्षातील मतभेद पुन्हा एकदा उघड झाले आहेत. बुधवारी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार बोलावलेल्या बैठकीस माजी मंत्री आणि वरिष्ठ काँग्रेस नेते सुनील केदार अनुपस्थित राहिल्याने चर्चेला उधाण आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केदार हे प्रदेश नेतृत्वाच्या निर्णयावर नाराज असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, निवडणूक प्रभारी विरेंद्र जगताप यांनी “काँग्रेसमध्ये सर्व काही सुरळीत आहे” असा दावा केला आहे.
नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी इच्छुक कार्यकर्त्यांची मुलाखत सुनील केदार यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली होती. परंतु, प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी या बैठकीला पक्षशिस्तीच्या विरोधात ठरवत ती रद्द केली. तसेच जिल्हाध्यक्ष अश्विन बैस यांना नवीन मुलाखती निवडणूक प्रभारी विरेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्याचे आदेश दिले.
त्याच अनुषंगाने आज नागपूर जिल्हा काँग्रेस कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीस ग्रामीण काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते उपस्थित होते, मात्र सुनील केदार अनुपस्थित राहिले. त्यांच्या गैरहजेरीमुळे पक्षातील गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, केदार हे प्रदेश नेतृत्वाच्या निर्णयावर नाराज आहेत.
तथापि, निवडणूक प्रभारी विरेंद्र जगताप यांनी कोणत्याही गटबाजीचे अस्तित्व नाकारले. त्यांनी सांगितले की “सुनील केदार हे मुंबई दौर्यावर असल्याने बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत.”
नागपूर जिल्हा काँग्रेसमध्ये उमेदवार निवडीवरून सुरू असलेली ही खदखद आता येत्या निवडणुकांच्या रणनीतीवर किती परिणाम करेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.










