नागपूर : वन विभागाच्या मिहान परिसरात सुरु असलेल्या वनरक्षक पदाच्या भरतीत झालेल्या धाव चाचणी दरम्यान मोठा गोंधळ पाहायला मिळाला. गुरुवारी उमेदवारांना चाचणी पूर्ण केल्यानंतर टायमिंग न सांगितल्याचा आरोप करीत उमेदवारांसह त्यांच्या पालकांनी आक्रमक पवित्रा घेतला.
परंतु ही भरती प्रक्रीया ऑनलाईन आणि पारदर्शकपणे होत असून यात कुठलाच मानवी हस्तक्षेप करण्यात येत नसल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पटवून सांगितल्यानंतर संतापलेले उमेदवार आणि पालक शेवटी शांत झाले.
वन विभागाच्या वतीने वनरक्षक या पदासाठी महिला आणि पुरुष उमेदवारांची धाव चाचणी २१ फेब्रुवारी २०२४ पासून मौजा कलकुही, लुपिन चौक, मिहान येथे घेण्यात येत आहे. गुरुवारी मात्र या भरती प्रक्रियेत पालकांनी गोंधळ घातला. ३ किलोमिटरची धाव चाचणी पूर्ण केलेल्या महिला उमेदवारांना त्यांचे टायमिंग आणि मार्क सांगण्यात आले नसल्याचा आरोप पालकांनी केला.
यामुळे काही काळासाठी येथे गोंधळाची स्थिती निर्माण झाली. अखेर अधिकाऱ्यांनी पालकांची समजुत घालून त्यांना भरती प्रक्रिया इन कॅमेरा व पारदर्शकपणे राबविण्यात येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी पालकांना दिली.