Published On : Mon, Dec 24th, 2018

शहरातील विविध विकास कामे कालबद्ध आराखड्यानुसार पूर्ण करा – नितीन गडकरी

Advertisement

नागपूर : शहरातील रस्ते, पाणी, वीज यासारख्या मूलभूत गरजांची पूर्तता करताना विविध भागातील सिमेंटचे रस्ते, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे बांधण्यात येत असलेले उड्डाण पूल, नागपूर मेट्रो अंतर्गत सुरु असलेली विकास कामे कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या सूचना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिल्यात.

ऑरेंजसिटी स्ट्रीटच्या पहिल्या टप्प्याचे बांधकाम मेट्रोतर्फे करण्यात येणार असून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमीपूजन तसेच रामझुला टप्पा दोनचे उद्घाटन येत्या 19 जानेवारी रोजी करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने विकास कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात यावेत, असे निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास, महामेट्रो तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेत.

Advertisement

वनामती येथील सभागृहात नागपूर शहरातील विविध विकास कामांचा आढावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतला. यावेळी बैठकीला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार सुधाकर कोहळे, कृष्णा खोपडे, महापौर श्रीमती नंदाताई जिचकार, स्थायी समितीचे अध्यक्ष विरेंद्र कुकरेजा, उपमहापौर श्री. पार्डीकर, नागपूर मेट्रो रेल्वे कार्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, महापालिका आयुक्त अभिजित बांगर, मध्य रेल्वेचे डीआरएम एस. एस. उप्पल, केंद्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाचे मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार, स्मार्ट सिटीचे प्रकल्प संचालक रामनाथ सोनवणे आदी विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement

केंद्रीय मार्ग निधीअंतर्गत सुरु असलेल्या कामांमध्ये जुना भंडारा रोड ते सुनील हॉटेल रस्त्याचे रुंदीकरण या कामांसाठी भूमीपूजन, केळीबाग रोडचे रुंदीकरण तसेच नागपूर रेल्वेस्टेशन ते जयस्तंभ चौक व मानस चौक या रस्त्यांचा विकास करण्यासंदर्भात आढावा घेताना केंद्रीय मंत्री श्री. गडकरी म्हणाले की. रेल्वे स्टेशन रस्त्याच्या विकासाठी 234.21 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून नागपूर महामेट्रोमार्फत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

या प्रकल्पाची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. शहरात राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरणामार्फत भंडारा रोड ते पारडी उड्डाण पूल या कामाला गती देवून हे काम प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्यात.

ऑरेंजसिटी, मेट्रोमॉल संदर्भात महानगरपालिका व महामेट्रो दरम्यान सामंजस्य करार पूर्ण झाला असून पहिल्या टप्प्यातील 3 हजार 308 चौरस मीटर क्षेत्रफळावर विकास कामासंदर्भात तातडीने सुरुवात करावी, अशा सूचना महामेट्रोला यावेळी देण्यात आल्यात.

रेल्वेच्या जागेवर वसलेल्या झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे देताना मध्य रेल्वेला तिसरी व चौथी रेल्वे लाईन सुरु करण्यासंदर्भात आवश्यक असलेली जागा उपलब्ध करुन दिल्यानंतर इतर जागेवरील झोपडपट्टीधारकांना पट्टे देताना महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी व रेल्वेच्या अधिकांऱ्यांनी एकत्र बसून यासंदर्भात निर्णय घ्यावा, अशी सूचना यावेळी करण्यात आली. सिमेंट रस्त्यासंदर्भात रिंगरोडवरील कामे 31 मार्चपूर्वी पूर्ण करावीत. तसेच वीज, पाणी आदी सुविधांना अडथळा होणार नाही याबाबत काळजी घ्यावी. यासंदर्भात महापौरांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेवून निर्णय घ्यावा, असेही यावेळी सांगण्यात आले.

अनधिकृत अभिन्यासामध्ये विकास कामे पूर्ण करा
शहरातील अनधिकृत अभिन्यासासंदर्भात नागपूर सुधार प्रन्यासकडे असलेल्या अभिन्यास नागपूर महानगरपालिकेकडे हस्तांतरित करावे. तसेच या संपूर्ण अभिन्यास्यांवर पिण्याचे पाणी रस्ते आदी सुविधा महानगरपालिकेने उपलब्ध करुन द्यावेत. यासंदर्भात नागरिकांच्या तक्रारीवर महानगरपालिकेने दखल घ्यावी, अशा सूचनाही श्री. गडकरी यांनी दिल्यात.

नागपूर महानगरपालिकेच्या जागेवर 15 घोषित झोपडपट्टया आहेत. त्यांना मालकी हक्काचे पट्टे वाटप करावे. तसेच नझुलच्या जागेवरील झोपडपट्टया महानगरपालिकेकडे हस्तांतरित करताना बांग्लादेशसारख्या खाजगी जमिनीवरील झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना सुद्धा मालकीहक्क मिळण्यासंदर्भात तात्काळ कार्यवाही करावी, असेही यावेळी त्यांनी सांगितले.

शहरातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतर्गत भंडारा रोड-पारडी उड्डाण पूल प्रकल्पात सुरु असलेल्या कामांचा यावेळी आढावा घेण्यात आला. संबंधित जागेतील भूसंपादनाची कार्यवाही मनपाच्या वतीने करण्यात येत आहे. शहरातील रेल्वे विभागांतर्गत येणाऱ्या विकास कामांच्या सद्य:स्थितीबाबत रेल्वे विभागाकडून सादरीकरण करण्यात आले.

नागपूर मेट्रो रेल्वेच्या सद्य:स्थितीबाबत तसेच नागपूर सुधार प्रन्यास, मनपा आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून मेट्रोला हस्तांतरित करण्यात आलेल्या प्रकल्पाच्या एमओयूबाबत पुढील कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले. यशवंत स्टेडियम परिसराचा एकत्रित विकास करण्यासाठी एकत्रित आराखडा तयार करण्यात आला. एकत्रित आराखडा तयार झाल्यानंतर आराखड्यातील जागा वापरानुसार त्यात आवश्यक ते फेरबदल करण्यात येतील.

नागनदीच्या विकास व स्वच्छतेसाठी नागनदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पासाठी 1252 कोटी 33 लाख एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे. प्रकल्पाचे वित्तीय नियोजन केंद्र व राज्य शासनाद्वारा प्रकल्प राशीच्या 85 टक्के अनुदान स्वरुपात 1065 कोटी रुपये प्रस्तावित आहे. जिका(जपान) हे केंद्र व राज्य शासनास मृदू लोन देणार आहे. 6 जानेवारी 2019 रोजी जिका चमू नागपूर महानगरपालिकेत पाहणीसाठी येणार आहे. नागनदी निर्मूलन प्रकल्प राबविल्यावर नाग व पिवळी नदीच्या काठावरील सौंदर्यीकरणाचे काम प्रस्तावित आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सुरु असलेल्या शासन पोर्टलवर प्रमाणीकरण करुन पात्र लाभार्थ्यांची यादी नागपूर सुधार प्रन्यासला सादर करण्यात आली आहे. नागपूर शहरात चालू असलेल्या सिमेंट रस्ते प्रकल्पाबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

बुधवार बाजार, महाल, सोमवारी पेठ (सक्करदरा), नेताजी मार्केट, कमाल चौक मार्केट आणि मटन मार्केट, मच्छी मार्केट यासाठी जागा निश्चित करण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच नागपूर शहरातील वाहतूक व्यवस्थेबाबत चर्चा करताना मानस चौक ते जयस्तंभ चौकापर्यंत वाहतुकीची कोंडी सोडविण्याकरिता उड्डाण पूल तोडण्यास्तव महानगरपालिकेद्वारा मंजुरी प्राप्त आहे. या आराखड्याबाबतही संबंधितांना निर्देश देण्यात आले. शहरातील विविध खेळांच्या मैदानाबाबत 7 कोटींचे विनियोजन करण्यात आले आहे. शहरातील क्रीडा प्रेमींना लवकरात लवकर तयार क्रीडांगणे उपलब्ध व्हावे. तसेच येथे विविध राज्यस्तरावरील तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आयोजित करण्यासाठी शहराची खेळांची मैदाने सुसज्ज असावीत यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भर दिला.

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर शहराच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना अमृत योजनेंतर्गत पिण्याचे पाण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्याचे सूचना दिली. या अंतर्गत अनधिकृत, अधिकृत अभिन्यासामध्ये पाणी पुरवठा प्रणालीचे विस्तारीकरण, उन्नतीकरण व बळकटीकरण यासाठी 273 कोटी 78 लक्ष रुपयांच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यामध्ये केंद्र शासनाकडून 91 कोटी 25 लक्ष, राज्य शासनामर्फे 45 कोटी 64 लक्षांचा निधी अनुदान स्वरुपात उपलब्ध होत आहे. ही कामे तातडीने सुरु करावीत, अशी सूचनाही यावेळी दिली.

प्रारंभी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी विविध विकास कामासंदर्भात सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
 

Advertisement