Published On : Fri, Dec 28th, 2018

सक्करदरा तलाव स्वच्छतेचे काम प्राधान्याने पूर्ण करा

आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश : आमदार सुधाकर कोहळे यांच्यासह केली संयुक्त पाहणी

नागपूर : सक्करदरा तलावाच्या पाण्यात झालेली जलपर्णी काढण्यासाठी स्वयंसेवी संस्थेने घेतलेल्या पुढाकाराला महानगरपालिकाही बळ देईल. या कामावर मनपाचे कर्मचारी वाढवून देण्यात येईल. लवकरात लवकर हे काम पूर्ण करा, असे निर्देश मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी नेहरूनगर झोनच्या अधिकाऱ्यांना दिले.

Gold Rate
24 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,23,400 /-
Gold 22 KT ₹ 1,14,800 /-
Silver/Kg ₹ 1,51,600/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आमदार सुधाकर कोहळे यांच्या पुढाकारातून क्लिन फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेने सक्करदरा तलावातील जलपर्णी काढून तलाव स्वच्छ करण्याचा संकल्प केला. २२ डिसेंबर रोजी या कार्याचा श्रीगणेशाही झाला. आतापर्यंत सुमारे ५० ट्रक जलपर्णी व कचरा तलावातून काढण्यात आला. या कार्यासाठी क्लिन फाऊंडेशन शक्य तेवढे सहकार्य करीत आहे. मात्र, यासाठी काही निधीची मागणी आमदार सुधाकर कोहळे यांनी नागपूर महानगरपालिकेकडे केली होती.

मात्र, अद्यापही तो निधी मिळाला नाही. यासंदर्भात जाणून घेण्यासाठी आणि कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आमदार कोहळे यांनी मनपा आयुक्तांसह सक्करदरा तलावाची शुक्रवारी (ता. २८) पाहणी केली. यावेळी निधीसंदर्भातील खंत त्यांनी बोलून दाखविली. सोबतच जलपर्णी काढण्यासाठी आवश्यक मशिनरी, हातमोजे व अन्य साहित्य मनपाने पुरवावे, असेही सांगितले. यावर मनपा आयुक्तांनी सहमती दर्शवित महानगरपालिकेचीही २६ कर्मचाऱ्यांची टीम या कामावर दिली असल्याचे सांगितले. संबंधित निधी शुक्रवार सायंकाळपर्यंत मिळेल, असे आश्वासन दिले.

आमदार सुधाकर कोहळे यांनी यावेळी मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांना सक्करदरा तलावाबाबत माहिती दिली. तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी काही वर्षांपूर्वी दीड कोटींचा निधी मंजूर झाला होता. त्यापैकी ४० लक्ष रुपये नासुप्रला प्राप्त झाले होते. त्यातून तलावाच्या भिंतीचे कार्य करण्यात आले. तलावाच्या सौंदर्यीकरणाचा एक प्रस्ताव पुन्हा तयार केला असून पूर्वीचा उर्वरीत निधी मिळून सुमारे एक कोटी १० लाख रुपये यासाठी खर्च अपेक्षित आहे. ९ जानेवारी रोजी यासंदर्भात बैठक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तलावाच्या एका बाजूच्या खचलेल्या भिंतीची डागडुजी यासह एक-दोन कामे मनपाने तातडीने करून द्यावी, असेही सुधाकर कोहळे यांनी म्हटले.

मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी आमदार कोहळे यांनी सुचविलेली कामे तातडीने करण्याचे निर्देश दिले. तलावातून येत असलेली दुर्गंधी नेमकी कशामुळे याचे कारण शोधून ती दूर करण्याचाही प्रयत्न मनपा करेल. तलाव स्वच्छतेच्या कामात कुठलाही अडथळा येणार नाही. स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत तलाव स्वच्छ करणे प्राधान्यक्रमाचे आहे. यामुळे क्लिन फाऊंडेशनने जो पुढाकार घेतला याबद्दल त्यांचे अभिनंदनही केले.

यावेळी नेहरू नगर झोन सभापती रिता मुळे, नगरसेविका स्नेहल बिहारे, क्लिन फाऊंडेशनचे दीपक निलावार व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement