Published On : Mon, Jun 5th, 2017

सेवाग्राम परिसर विकासाची कामे लवकर सुरु करुन जलद पूर्ण करा – अपूर्व चंद्रा

Advertisement


नागपूर:
सेवाग्राम परिसर विकास आराखड्यात समाविष्ट असलेली कामे त्वरित सुरु करुन जलद पूर्ण करण्यात यावीत, असे राज्याच्या नियोजन विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा यांनी सांगितले.

यावेळी विभागीय आयुक्त अनूप कुमार, डॉ. दीपक म्हैसेकर, मुख्य अभियंता उल्हास देबडवार, अधीक्षक अभियंता डी. के. बालपांडे, नियोजन अधिकारी कृष्णा फिरके, मीरा अडारकर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या वर्षी झालेल्या शिखर बैठकीत सेवाग्राम विकास आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले होते. त्यानुसार सेवाग्राम परिसरात पायाभूत नागरी सुविधा निर्मितीसाठी येथील विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत सेवाग्राम परिसर विकास आराखड्यात समाविष्ट कामांचा तसेच अन्य कामांसाठी 145 कोटी खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

यामध्ये सेवाग्राम आश्रमातील यात्री निवास व संबंधित कामे,वारसा संवर्धन व नागरी रचनेअंतर्गत कामे, पर्यावरण, पायाभूत सुविधांचा विकास तसेच हेरिटेज पर्यटन विकासासाठी नागरी सुविधा, धाम नदीकाठाचा विकास, नूतनीकरण व सुशोभीकरणाच्या कामांचा समावेश आहे. या कामांबाबातची माहिती बैठकीत सादर करण्यात आली. विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी सेवाग्राम विकास आराखड्यात समाविष्ट कामांचे अंदाजपत्रक, तांत्रिक व प्रशासकीय मान्यता या बाबी कालबध्द पध्दतीने पूर्ण कराव्यात तसेच या कामांबाबत काही स्थानिक बाबींच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने संबंधितांची बैठक घ्यावी, असे सांगितले.

तसेच यावेळी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी नागपुरातील मोठा ताजबागच्या नियोजित विकास आराखड्याचे सादरीकरण केले. मोठा ताजबाग विकासासाठी 132 कोटी रुपयांचा निधी नियोजित असून, 24 एकर जागेच्या परिसरात हा प्रकल्प राबविण्यात आला येत आहे. पायाभूत सुविधा व परिसर सौंदर्यीकरण करण्यासाठी आराखडा तयार करुन त्याचे संनियंत्रण करण्यासाठी नागपूर सुधार प्रन्यास यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

मोठा ताजबागच्या विकासकामांच्या पहिल्या टप्प्यात दर्गा कॉम्प्लेक्स, ऊर्स मैदानाची संरक्षण भिंत, पथदिवे, रस्त्यांचे डांबरीकरण, तसेच प्रसाधनगृहांचे काम, मुख्य प्रवेशद्वार, विस्थापितांकरीता शॉपींग कॉम्प्लेक्सचा समावेश असून, त्यासोबतच दुसऱ्या टप्प्यातील सर्व कामे पूर्ण झाली असल्याचे यावेळी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सादरीकरणातून सांगितले.