Published On : Tue, May 18th, 2021

नदी आणि नाले स्वच्छता अभियानाचे कार्य ३० मे पूर्वी पूर्ण करा

Advertisement

महापौर दयाशंकर तिवारी यांचे निर्देश : दहाही झोनच्या कार्याचा घेतला आढावा

नागपूर : नागपूर शहरामधून वाहणा-या नाग, पिवळी व पोहरा या तिनही नद्यांसह शहर हद्दीतून वाहणा-या सर्व नाल्यांच्या संपूर्ण स्वच्छतेचे कार्य येत्या ३० मे पूर्वी पूर्ण करा, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले.

नदी व नाले स्वच्छता अभियानांतर्गत सुरू असलेल्या कार्याचा मंगळवारी (ता.१८) महापौर दयाशंकर तिवारी यांनी मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये व्हर्च्यूअल बैठकीमध्ये आढावा घेतला. यावेळी सभागृहामध्ये महापौर दयाशंकर तिवारी व निगम सचिव डॉ. रंजना लाडे उपस्थित होते. व्हर्च्यूअल पद्धतीने स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, धरमपेठ झोन सभापती सुनील हिरणवार, उपनेत्या वर्षा ठाकरे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, माजी सत्तापक्ष नेता संदीप जाधव, नगरसेवक प्रदीप पोहाणे, विक्रम ग्वालबंशी, उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ. प्रदीप दासरवार, मुख्य अभियंता मनोज तालेवार, सहायक आयुक्त सर्वश्री प्रकाश वराडे, विजय हुमने, अशोक पाटील, सहायक आयुक्त सुषमा मांडगे, साधना पाटील, कार्यकारी अभियंता सर्वश्री गिरीश वासनिक, अविनाश बारहाते, अविनाश भुतकर यांच्यासह सर्व झोनचे झोनल अधिकारी जुळले होते.

प्रारंभी मुख्य अभियंता मनोज तालेवार यांनी झोन निहाय नदी स्वच्छतेच्या कार्याची तर उपायुक्त डॉ.प्रदीप दासरवार यांनी नाले सफाईच्या कार्याची माहिती दिली. आतापर्यंत पोहारा नदीच्या सफाईचे ६५ टक्के काम पूर्ण झाले असून ३५ टक्के शिल्लक आहे तर पिवळी नदीची ६० टक्के सफाई झाली असून ४० टक्के शिल्लक आहे. नाग नदीच्या स्वच्छतेचे ५७ टक्के कार्य झाले असून ४३ टक्के कार्य शिल्लक आहे. याशिवाय शहरात एकूण २३२ नाले आहेत. या २३२ नाल्यांपैकी १५५ नाल्यांची मनुष्यबळाद्वारे तर ७७ नाल्यांची मशीनद्वारे सफाई करावी लागते. आतापर्यंत मशीनद्वारे २१ नाल्यांची सफाई पूर्ण झाली आहे तर मनुष्यबळाद्वारे १०४ नाल्यांची सफाई पूर्ण करण्यात आली आहे. एकूण २३२ पैकी १२५ नाल्यांची सफाई पूर्ण झालेली आहे. सोबतच मोठ्या नाल्यांसाठी मशीनद्वारे काम सुरू आहे. हे सर्व कार्य प्रगतीपथावर असून लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास प्रशासनाद्वारे व्यक्त करण्यात आला.

नदी स्वच्छतेदरम्यान नदीमधून काढण्यात येणारा गाळ, माती तशीच पडून राहू नये याबाबत विशेष काळजी घेण्याचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी निर्देशित केले. नदीमधून काढण्यात येणा-या मातीचा उपयोग रस्ता दुभाजकांवर झाडे लावण्यासाठी केला जावा, याबाबत कार्यवाही करण्याचेही निर्देश त्यांनी दिले. नदी व नाल्यामध्ये कचरा झाल्यानंतर तो साफ करण्यापेक्षा त्यामध्ये कचरा होउच नये याची काळजी घेतली जावी. पुलाच्या पायथ्याला पाण्याच्या प्रवाहापुढे जाळी लावल्यास कचरा तिथेच अडकविला जाउ शकतो व त्यामुळे नदी वा नाल्यामध्ये थेट कचरा जाणार नाही. याशिवाय नदीमधील माती काढण्यासाठी दरवर्षी काही भागातील नदीची सुरक्षा भींत तोडावी लागते व पुन्हा तिचे बांधकाम करावे लागते. दरवर्षी भींत तोडणे व बांधकाम करणे हे योग्य नाही यासाठी ज्या भागातून माती काढायची आहे त्या ठिकाणी भींतीला गेट बसवून त्या ठिकाणाहून माती काढण्याचे नियोजन करण्यात यावे. यासंदर्भात कामाच्या राशीचे प्राकलन तयार करून ते सादर करण्यात यावे. याबाबत कार्यवाही करण्यात येईल. शहरातील अनेक वस्त्यांमधून नाले वाहत आहेत. या नाल्यांची पावसाळ्यापूर्वी सफाई करण्याचे कार्य सुरू आहे. नाल्यांचे सफाई कार्य करताना स्थानिक नगरसेवकांना माहिती देण्याचेही निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले.

एकूणच संपूर्ण नदी व नाले स्वच्छता अभियानाचे कार्य सुरळीत सुरू आहे. मात्र ऐन पावसाळ्यात नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होउ नये यासाठी मान्सूनपूर्वी संपूर्ण तयारी होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने येत्या ३० मे पूर्वी सर्व कार्य पूर्ण होईल, अशा स्वरूपात कार्याची गती वाढविण्यात यावी. याबाबत कुठलिही अडचण आल्यास त्याची माहिती तात्काळ महापौर कार्यालयामध्ये देण्यात यावी, असेही निर्देश त्यांनी दिले. संपूर्ण अभियानाचे कार्य ३० मे पर्यंत पूर्ण होण्याबाबत कार्यवाही सुरू आहे मात्र नाग नदीच्या शेवटच्या पॅचमेंटच्या स्वच्छतेसाठी आवश्यक मशीन उशीरा मिळाल्याने या कार्याला थोडा विलंब होणार असल्याची माहिती प्रशासनाद्वारे देण्यात आली. यावर तातडीने सर्व कार्य सुरळीत करून लवकरात लवकर कार्य पूर्ण करावे, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले.

सतरंजीपूरा झोनचे विशेष अभिनंदन
बैठकीमध्ये महापौर दयाशंकर तिवारी यांनी सतरंजीपुरा झोनच्या पथकाचे विशेष अभिनंदन केले. सतरंजीपुरा झोनमध्ये एकूण २२ नाले आहेत. यापैकी १८ नाल्यांची मनुष्यबळाद्वारे सफाई करावी लागते. विशेष म्हणजे झोनमधील मनुष्यबळाद्वारे सफाई करावी लागणा-या सर्व १८ नाल्यांची मुदतीपुर्वीच सफाई करण्यात आलेली आहे. झोनच्या स्वच्छता पथकाचे कार्य हे स्तूत्य असून इतर झोनच्या अधिकारी व कर्मचा-यांनी यापासून प्रेरणा घेत कामाला गती घ्यावी, असे सांगत महापौर दयाशंकर तिवारी यांनी मनपाचे उपायुक्त डॉ. प्रदीप दासरवार व सतरंजीपूरा झोनचे अधिकारी श्री. आत्राम यांचे विशेष अभिनंदन केले.

नदीकाठावर वृक्षारोपणाबाबत कार्यवाही करा
नदी स्वच्छता अभियानासोबतच यावर्षी तीनही नद्यांच्या काठावर वृक्षारोपण करण्यात येणार आहे. वृक्षरोपणाला जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पोहरा नदीपासून सुरूवात केली जाणार आहे. यामध्ये फळ, औषधींची झाडे लावण्यात येणार आहेत. तसेच वृक्षारोपणात नागरिकांचा सहभाग असावा यासाठी स्मृती वृक्ष, ग्रह उद्यान, नक्षत्र उद्यान, वन औषधी, फळ वृक्षारोपण करण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले आहेत.. नागरिकसुध्दा वृक्षांचे जतन व संवर्धन करतील.

नदी व नाले स्वच्छता अभियानाची झोननिहाय स्थिती