Published On : Fri, May 29th, 2020

नदी, नाले, चेंबरची सफाई सात दिवसांत पूर्ण करा अन्यथा जबाबदार धरण्यात येईल – महापौर

नदी, नाले स्वच्छतेचा घेतला आढावा

नागपूर: पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी नागपुरातील तीन नद्या, शहरातील नाले आणि पावसाळी नाल्यांची सफाई करण्यात येते. यावर्षी काम वेळेआधी सुरू करण्यात आले असले तरी अद्याप पूर्ण झाले नाही. त्याचा वेग वाढवा. पुढील सात दिवसांत सफाई पूर्ण करण्यात यावी, अन्यथा पावसाळ्यात पूरसदृश परिस्थिती उद्‌भवल्यास संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा महापौर संदीप जोशी यांनी दिला.

Advertisement

शहरातील नदी, नाला, चेंबर सफाईचा आढावा घेण्यासाठी मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महापौर संदीप जोशी यांच्यासह उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समितीचे सभापती विजय (पिंटू) झलके, सत्ता पक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, आमदार तथा ज्येष्ठ नगरसवेक प्रवीण दटके, आरोग्य सभापती वीरेंद्र कुकरेजा, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, सुनील अग्रवाल, प्रतोद दिव्या धुरडे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त प्रदीप दासरवार, अधीक्षक अभियंता (जलप्रदाय) श्वेता बॅनर्जी, सहायक आयुक्त राजू भिवगडे, प्रकाश वराडे, अशोक पाटील, किरण बागडे, स्नेहा करपे, गणेश राठोड, साधना पाटील, सुषमा वांडगे उपस्थित होते.

नाग नदी, पिवळी नदी आणि पोरा नदी या तीनही नद्या मिळून सुमारे ४६ किलोमीटरची लांबी आहे. यातील सुमारे ४४ किलोमीटर स्वच्छतेचे कार्य पूर्ण झाले आहे. उर्वरीत कार्य ३० मे पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी यांनी दिली. नदीतून काढलेला गाळ आणि माती शक्यतो सुरक्षा भिंतीजवळ न ठेवता बाहेर काढून इतरत्र टाकण्याचा प्रयत्न आहे. जेथे हे शक्य होते, तेथील माती बाहेर काढण्यात आली. मात्र, जेथे शक्य नाही, तेथे ती सध्या ठेवण्यात आली आहे. नदी स्वच्छतेसाठी १० पोकलेनचा वापर करण्यात आला असल्याची माहितीही श्रीमती बॅनर्जी यांनी दिली.

नाग आणि पिवळी नदीचा जेथे संगम आहे, त्यापुढेही खोलीकरण आणि स्वच्छतेचे कार्य करणे गरजेचे आहे. पोरा नदीचे स्वच्छता कार्यसुद्धा ग्रामीण भागात करणे गरजेचे आहे. कारण शहरात जरी स्वच्छता केली तरी ग्रामीण भागात पाणी अडले तर त्या अडलेल्या पाण्यामुळे नागपूर शहरात पाणी साचते. त्यामुळे शहर हद्दीच्या बाहेरही स्वच्छता करण्याची सूचना माजी महापौर तथा आमदार प्रवीण दटके यांनी केली.

यावेळी सर्व सहायक आयुक्तांनी मोठे नाले, लहान नाले, चेंबर आणि पावसाळी नाल्यांच्या सफाईच्या प्रगतीची माहिती दिली. मशीन उशिरा मिळाल्यामुळे धंतोली झोनचे कार्य १० जूनपर्यंत होईल, अशी माहिती सहायक आयुक्त किरण बागडे यांनी दिली. अन्य झोनची नाले सफाईची उर्वरीत कामे पुढील पाच दिवसांत होईल, अशी माहिती संबंधित सहायक आयुक्तांनी दिली. वस्त्यांमधील लहान नाल्यांची स्वच्छता मनुष्यबळाद्वारे सुरु असून त्याचेही काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
‘त्या’ शाळांना नोटीस द्या

नागपुरातील सेंट झेविअर्स आणि सेंट पॉल शाळा नदीलगत आहे. मुख्य रस्त्यापासून शाळेत जाण्यास अद्यापही योग्य सोय नाही. शाळांचा आजूबाजूचा परिसर सखल असल्यामुळे तेथेही पाणी साचते. बऱ्याचदा अग्निशमन विभागाच्या सहकार्याने शाळेतून मुलांना बाहेर काढण्याचे कार्य करण्यात येते. विद्यार्थ्यांची सुरक्षा ही शाळांची जबाबदारी आहे. त्यामुळे मनपातर्फे त्या शाळांना नोटीस बजावून पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता शाळांनी तशी व्यवस्था करावी, अशा आशयाची नोटीस बजावण्याचे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी संबंधित सहायक आयुक्तांना दिले.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement