Published On : Mon, Dec 10th, 2018

पालकमंत्र्यांच्या ‘जनसंवाद’मध्ये तक्रारींचा पाऊस

नागपूर: शहरातील नागरिकांच्या समस्या ऐकून घेऊन त्यावर जागेवरच निर्णय घेण्यासाठ़ी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट नागरिकांशी संवाद साधण्याचा उपक्रम सुरु केला आहे. आज आशीनगर झोनच्या जनसंवाद कार्यक्रमात पालकमंत्र्यांकडे नागरिकांच्या तक्रारींचा पाऊस पडला असून या तक्रारींवर जागच्या जागीच निर्णय करण्यात आले. या कार्यक्रमाला अनुपस्थित राहणार्‍या अधिकार्‍यांची वेतनवाढ थांबविण्याचे प्रस्ताव देण्याचे निर्देश पालकमंत्री बावनकुळे यांनी दिले असून शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये व शासनाच्या जागेवरील कुटुंबांना 3 महिन्यात पट्टेवाटपाची कारवाई करण्यास सांगण्यात आले, तर झोनमध्ये साफसफाईबद्दल नागरिकांच्या तीव्र भावना यावेळी व्यक्त केल्या. प्रत्येक नगरसेवकाला 2 ग्रीन जीम देण्याची घोषणा पालकमंत्र्यांनी या कार्यक्रमात केली. नागपूर सुधार प्रन्यासबद्दल नागरिकांच्या 73 तक्रारी आल्या होत्या.

आजच्या जनसंवादच्या निमित्ताने पालकमंत्र्यांनी 4 तासापेक्षा अधिक काळ नागरिकांच्या तक्रारी व समस्या ऐकून घेतल्या. आपल्या तक्रारी थेट पालकमंत्र्यांकडे मांडण्याची संधी उपस्थित तक्रारकर्त्यांना देण्यात आली. आशीनगर झोनचे प्रांगण नागरिकांनी खचाखच भरले होते. या कार्यक्रमाला महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, आ. डॉ. मिलिंद माने, स्थायी समिती अध्यक्ष विकी कुकरेजा, सभापती वंदना चांदेकर, नगरसेविका भावना लोणारे, मनोज सांगोळे, संदीप सहारे, नगरसेवक सुनील अग्रवाल, बसपा नेते मोहम्मद जमाल मनपा आयुक्त, अति. आयुक्त आदी उपस्थित होते.

Advertisement

या जनसंवाद कार्यक्रमात नागरिकांनी वनजमिनीबाबत प्रश्न, अपंगाच्या योजनांपासून वंचित लाभार्थी, अन्न नागरी पुरवठा विभागाचे प्रश्न, रेशन दुकानासाठी अर्ज, सर्वांसाठी अन्न योजनेचा आढावा घेण्यात आला. या योजनेत सुमारे 80 हजार लाभार्थींना रेशन मिळेल एवढी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. म्हाडामार्फत सुरु असलेल्या योजनांबद्दलच्या तक्रारी, शिक्षण विभागाच्या तक्रारींमध्ये यशोधरानगरमध्ये उर्दू माध्यमाची शाळा काढण्यास परवानगी, जुना टेका नाका येथील मंदिर स्थलांतरित करण्याबद्दलची मागणी, नगरभूमापन विभागाकडून नारी येथील स्मशानभूमीची जागा मोजणी करून देण्याची मागणी, पाचपावली शाळेसमोर असामाजिक तत्त्वांची दादागिरी हे प्रश्न चुटकीसरशी सोडविले गेले.

परिवहन विभागाकडील शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी बससेवा सुरु करण्याची मागणी, अतिक्रमणाच्या तक्रारी, आरोग्य विभागाच्या समस्या, बाजार विभाग, झोपडपट्टी विभाग, बांधकाम विभाग नवीन रस्ते, रस्त्यांची दुरुस्ती, मोकाट कुत्रे आणि डुकरांच्या त्रासामुळे नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. डुकरे पकडण्यासाठी आतापर्यंत 3 वेळा निविदा काढण्यात आल्या पण कुणीही हे काम करण्यास समोर येत नसल्याची माहिती यावेळी सांगण्यात आली. अतिक्रमण हटविणे, खेळाच्या मैदानांचा विकास करण्यासाठी शासनाने प्रत्येक मैदानाला 1 कोटी देण्याची योजना असल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

जलप्रदाय विभागाच्या 8 तक्रारी या कार्यक्रमात आल्या. नळाला पाणी येत नाही. पाईपलाईन लीकेज आहे, अशा या तक्रारी होत्या. लोककर्म विभागाच्या 46 तक्रारी आल्या असून त्यासाठी 73 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. या कार्यक्रमात चुकीची माहिती देणार्‍या अधिकार्‍यांवर नागरिकांनी तोंडसुख घेतले.

नगरसेवकांनी सुचविलेल्या कामांना प्राधान्य द्या आणि सहा महिन्यात सर्व कामे पूर्ण करण्याचे आश्वासन या विभागाने दिले. इस्लामिक कल्चरल सभागृहाबद्दल तक्रारकर्त्यांनी गोंधळ घातला. 20 वर्षांपासून हे काम सुरु असून पूर्ण होत नाही. निधी येतो आणि परत जातो पण सभागृह पूर्ण होत नाही. यावर 31 मार्चपर्यंत काम पूर्ण करा व एप्रिलमध्ये हे सभागृह संंबंधित संस्थेला द्या असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. उत्तर नागपुरातील बाजीराव साखरे वाचनालय हे सर्व सुविधांनी परिपूर्ण आहे. 31 एसी या वाचनालयात लागले आहेत. पण अजूनही ते सुरु करण्यात आले नाही. या संदर्भात आंदोलनेही झाली. नासुप्र मनपाला हस्तांतरित करण्यास तयार आहे. पण मनपा घेत नसल्याची माहिती समोर आली.

श्रीमती लाडे यांची वेतनवाढ थांबवणार
विवाह नोंदणी अधिकारी, तहसिलदार, आणि मनपा समाज कल्याण अधिकारी श्रीमती लाडे या कार्यक्रमाला अनुपस्थित होते. यावरून पालकमंत्र्यांनी या अधिकार्‍यांचे वेतनवाढ रोखण्याचे प्रस्ताव मनपा प्रशासनाला देण्यास सांगितले. समाजकल्याण विभागाकडे निधी असतानाही अपंगांना ई रिक्षा देण्यात आल्या नाहीत. येत्या 15 दिवसात अपंगांना या रिक्षा दिल्या नाही तर कारवाईचा इशारा पालकमंत्री बावनकुळे यांनी दिला.

2011 पूर्वीच्या रहिवाशांना घरांचे पट्टे
शहरातील झुडुपी जंगलाच्या जागा वगळता शासनाच्या 17 नोव्हेंबरच्या परिपत्रकानुसार शासकीय जागांवरील अतिक्रमण नियमित करून 2011 पूर्वीच्या रहिवाशांना मालकी हक्काचे पट्टे येत्या 3 महिन्यात देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. यावर मनपाने आजपर्यंत कारवाई केली नाही. यापुढे पट्टेवाटपाच्या हलगर्जी करणार्‍या अधिकार्‍यावर कारवाई करण्याचा इशाराही पालकमंत्र्यांनी दिला.

8 दिवसात झोनची सफाई करा
आशीनगर झोनमध्ये साफसफाईवरून नागरिकांच्या तीव्र भावना व्यक्त होत होत्या. कनक कंपनीची गाडी दररोज कचरा घेण्यासाठ़ी येत नाही. 4-5 दिवसातून एकदा येते. हॉटेलवाले पैसे देतात म्हणून तेथील कचरा दररोज उचलला जातो असा आरोप नागरिकांनी केला. मनपाचे अधिकारीही यावेळी निरूत्तर झाले होते. 8 दिवसात कामात सुधारणा करण्याचे अधिकार्‍यांचे आश्वासनही नागरिक ऐकत नव्हते. येत्या 8 दिवसात साफसफाईच्या कामात सुधारणा करण्याचे निर्देश पालकमंत्री बावनकुळे यांनी दिले.

डुकरे व मोकाट कुत्रे
आशीनगर झोनचे नागरिक डुकरे आणि मोकाट कुत्र्यांच्या त्रासामुळे हैराण आहेत. डुकरांनी वस्त्यांमध्ये घाण केली आहे. ती उचचली जात नाही. मोकाट कुत्रे पकडण्यासाठी आलेल्या वाहनाच्या कर्मचार्‍याला कुत्रे चावले पण तो कर्मचारी कुत्रे पकडू शकला नाही. डुकरांचे मालक नागरिकांना धमकी देतात अशा अनेक तक्रारी यावेळी समोर आल्या. डुकरे व कुत्रे पकडण्यासाठी आतापर्यंत तीनदा निविदा काढण्यात आल्या. पण कुणीही संस्था पुढे आली नसल्याचे कारण सांगण्यात आले. पुन्हा निविदा प्ऱक्रिया करण्याचे निर्देश देण्यात आले.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement