राष्ट्रकुल संसदीय अभ्यास वर्ग राज्याच्या हितासाठी सत्ताधारी आणि विरोधक एकत्र येणे हे लोकशाहीचे बलस्थान – निलेश मदाने

Nilesh Madane
नागपूर: सरकारच्या चांगल्या कामाचा विरोधकांनी गौरव करणे तर विरोधकांच्या चांगल्या सूचनांचा स्वीकार करुन विरोधी विचारांचा गौरव होणे त्याचबरोबर राज्याच्या हितासाठी सत्ताधारी आणि विरोधक एकत्र येणे ही लोकशाहीची बलस्थाने असल्याचे मत वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक निलेश मदाने यांनी आज येथे व्यक्त केले.

महाराष्ट्र राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्यावतीने आयोजित केलेल्या संसदीय अभ्यास वर्गात ‘भारतीय लोकशाहीची वैशिष्ट्यपूर्ण वाटचाल’ या विषयावर ते बोलत होते.

संसदीय लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यात मतभेद असू शकतात. परंतु त्यांचा विरोध हा व्यक्तीगत नसून तो एका विशिष्ट धोरणाला, तत्वाला विरोध असतो. तथापि राज्याच्या हितासाठी केंद्र शासनाकडे मागणी करावयाची असल्यास सत्ताधारी आणि विरोधक एकत्र येतात, असे सांगून श्री.मदाने पुढे म्हणाले, संसदीय लोकशाहीमध्ये आतापर्यंतच्या वाटचालीत सत्ताधारी पक्षाने विरोधकांच्या कामगिरीचा गौरव केला आहे हा इतिहास आहे. तसेच विरोधी पक्षांनीही सरकारच्या किंवा सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांचा गौरव केला आहे. विरोधाचा सन्मान करणे हे लोकशाहीचे बलस्थान आहे.

श्री. मदाने म्हणाले, ‘रोजगार हमी योजना’ सुरु करण्यासाठी विरोधकांनीही सकारात्मक भूमिका घेऊन पुढाकार घेतला होता. विरोधकांच्या सूचना सकारात्मक दृष्टीने स्वीकारुन शासनाने ही योजना सुरु केली होती. ही योजना दुष्काळी परिस्थितीत रोजगार देण्यासाठी उपयुक्त ठरली होती. पुढे या योजनेचा देश पातळीवर स्वीकार करण्यात आला. तसेच महाराष्ट्र विधीमंडळाने केलेल्या विविध कायद्यांचाही देश पातळीवर स्वीकार केला गेला आहे. स्वातंत्र्यानंतर आज पर्यंतच्या देशातील सत्तांतरांचे सविस्तर विवेचन करुन देशातील राजकीय घडामोडीची माहितीही श्री. मदाने यांनी दिली.

प्रारंभी विधीमंडळाचे अवर सचिव सुनिल झोरे यांनी वक्त्यांचा परिचय करुन दिला.