Published On : Fri, Jan 31st, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागरिकांच्या तक्रारींबाबत निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आयुक्तांचे निर्देश

मनपा तक्रार निवारण प्रणालीची आढावा बैठक

नागपूर : नागपूर महानगरपालिकेकडे ऑनलाईन पद्धतीने नोंदविण्यात येणाऱ्या तक्रारीं संदर्भात हयगय करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. महानगरपालिकेच्या ‘ग्रेव्हन्स रिड्रेसल पोर्टल’वर प्राप्त तक्रारी सोडविण्याला प्राधान्य देणे गरजेचे आहे. यामध्ये कोणताही निष्काळजीपणा स्वीकारला जाणार नाही, असेही त्यांनी बजावले.

मनपा तक्रार निवारण प्रणालीची आढावा बैठक आयुक्त यांच्या सभाकक्षात शुक्रवारी (ता.३१) पार पडली. बैठकीत अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल, श्री. अजय चारठाणकर, उपायुक्त श्रीमती विजया बनकर, श्री. विजय देशमुख, श्री. मिलिंद मेश्राम, डॉ. रंजना लाडे, अधिक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, अग्निशमन विभाग प्रमुख श्री.बी.पी. चंदनखेडे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, सर्व सहायक आयुक्त, सर्व कार्यकारी अभियंता व माहिती व तंत्रज्ञान विभागाचे श्री. स्वप्निल लोखंडे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

Gold Rate
Tuesday 18 Feb. 2025
Gold 24 KT 85,800 /-
Gold 22 KT 79,800 /-
Silver / Kg 96,900 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

शहरातील नागरिकांच्या तक्रारी सोडविण्याकरिता महानगरपालिकेने ऑनलाईन पोर्टल सुविधा सुरु केली आहे. त्यानुसार मनपा तक्रार निवारण प्रणालीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सप्टेंबर २०२४ ते जानेवारी २०२५ महिन्यापर्यंत नागरिकांकडून महानगरपालिकेला ऑनलाईन स्वरुपात करण्यात आलेल्या तक्रारी तसेच झोन स्तरावर व विविध विभागानुसार करण्यात आलेल्या तक्रार निवारण प्रणालीची माहिती अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी बैठकीत दिली. त्यांनी विविध विभागांकडे प्राप्त तक्रारीची माहिती दिली आणि त्या तक्रारी कोणत्या स्तरावर आहेत याची सुद्धा माहिती आयुक्तांना दिली. काही तक्रारीवर अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश सामान्य प्रशासन विभागाला आयुक्तांनी दिले. तसेच बैठकीमध्ये गैरहजर अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्याचे देखील त्यांनी निर्देश दिले. श्रीमती गोयल यांनी सांगितले की, मनपा तर्फे ०१ डिसेंबर २०२४ ते ३० जानेवारी २०२५ पर्यंत २६०५ तक्रारी चे निवारण करण्यात आले असून २३१२ तक्रारींवर नागरिकांचे मत प्राप्त झाले आहे.

झोनचे सर्व सहायक आयुक्त, उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंता यांना ऑनलाईन स्वरुपात नागरिकांकडून करण्यात आलेल्या तक्रारी सोडविण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. याशिवाय ज्या भागातून तक्रार आली आहे त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी भेट द्यावी. झोन स्तरावर आलेल्या तक्रारीचा आढावा सतत घ्यावा. तक्रारीची योग्य दखल घेत नागरिकांना ऑनलाईन उत्तरे देण्यात यावीत, असे निर्देशही डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. तसेच तक्रार निराकरणाच्या दृष्टीने काम सुरु असल्यास त्याची माहिती देण्याचे ही निर्देश दिले. तक्रारींच्या संदर्भात निष्काळाजीपणा केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा सक्त इशारा आयुक्तांनी दिला. शिवाय अनेक तक्रारी दोन किंवा तीन विभागांशी संबंधित असल्यास अशा तक्रारी प्रत्येक विभागांद्वारे समन्वय साधून सोडविण्यात याव्यात,अशा सूचनाही त्यांनी आढावा बैठकीत दिल्या.

Advertisement