Published On : Thu, Feb 13th, 2020

तुकाराम मुंढे यांचा बहुचर्चित अन्‌ नियोजित ‘आकस्मिक’ भांडेवाडी दौरा

Advertisement

नागपुर: बुधवारी १२ फेब्रुवारीला सकाळी दोन-चार इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या ‘आकस्मिक’ भांडेवाडी दौऱ्याची बातमी झळकू लागली. ‘तुकाराम मुंढे यांनी दिली भांडेवाडी डम्पिंग यार्डला आकस्मिक भेट, ओला आणि सुखा एकत्रित कचरा बघून अधिकाऱ्यांना धरले धारेवर’ या आशयाच्या बातम्या बघून जरा आश्चर्य वाटले. मुळात मुद्दा हा आहे की दौरा जर आकस्मिक असतो तर त्याची माहिती मोजक्या इलेक्ट्रॉनिक मीडियाला पुरवितो कोण?

राज्यात विविध ठिकाणी कर्तव्यावर असताना आपल्या शिस्तीच्या स्वभावामुळे गाजलेले आणि सध्या नागपूर महानगरपालिकेत आयुक्त असलेले तुकाराम मुंढे हे ज्या दिवसापासून येथे रुजू झाले त्या दिवसापासून मीडिया त्यांच्या मागे लागला आहे. अर्थात मीडियामध्ये चर्चेत कसे राहायचे, हे तुकाराम मुंढे यांना चांगलेच ठाऊक असल्याचे एकंदर १५ दिवसात अनुभवलेले चित्र आहे. जे कामं पदाधिकाऱ्यांनी करायची ती कामे प्रशासन करतेय हे एका माजी महापौर असलेल्या नेत्याने म्हटलेले वाक्य खूप काही सांगून जाते. आजकालच्या मीडियाला जेथे टीआरपी मिळतो, तेथे घुसण्याची सवय झाली आहे. तुकाराम मुंढे यांनी नागपुरात आल्यानंतर वेगळे काय केले, हे जर कोणी सपुरावा पटवून दिले तर त्याचा जाहीर सत्कार व्हायला हवाच. तुकाराम मुंढे यांनी आल्या-आल्या पहिल्याच दिवशी विभाग प्रमुखांचा ‘क्लास’ घेतला ज्यात काही नवीन नाही. उग्र स्वभावामुळे कोणता अधिकारी कसा आहे हे समजून न घेता अपशब्दात बोलणे, हे तुकाराम मुंढे या नावासोबतचे समीकरण आहे.

कुठल्याही नव्या पदावर रुजू होतानाच ज्या ठिकाणी रुजू होतोय तेथील कुठलाच अधिकारी आणि कर्मचारी काम करीत नाही, पदाधिकारी हे केवळ पैसे लाटण्यासाठीच विकास कामांच्या फाईल फिरवित असतात, असेच जर डोक्यात घालून आले तर त्यावर काहीच उपाय नाही. साधी मानसिकता आहे, ज्या संस्थेत ज्या अधिकाऱ्यांच्या भरोशावर आणि ज्या पदाधिकाऱ्यांच्या सोबतीने काम करायचे आहे, त्या व्यक्तींना किमान १५ दिवस समजून घेणे आवश्यक आहे. कोण काम करतं, कोण नाही करत, हे समजून घेण्यासाठी तुकाराम मुंढेंसारख्या अधिकाऱ्यांना १५ दिवस पुरेसे आहेत. त्यानंतर नियम, निर्णय, अधिकाऱ्यांची कानउघाडणी, पदाधिकाऱ्यांशी पंगा हे सगळे विषय घेता आले असते. परंतु आल्या-आल्याच चार कर्मचाऱ्यांचे निलंबन, अधिकाऱ्यांना उतरून बोलणे, आपले नाव प्रोटोकॉलमध्ये महापौरांच्या नंतरच असणे, जनता दरबार घेत व्हिडिओ काढण्याचे ऑर्डर देत ते व्हायरल करणे असे प्रकार ज्या नावाला वलय आहे, त्या नावाच्या व्यक्तीने करणे शोभनीय नक्कीच नाही.

तर विषय सुरू होता तुकाराम मुंढे यांनी नवीन काय केले? रुजू झाल्याबरोबर विभाग प्रमुखांची बैठक घेतली. मीडियात बातमी आली ‘मुंढे यांनी विभागप्रमुखांना धारेवर धरले.’, दुसऱ्या दिवशीपासून जनतेच्या तक्रारी ऐकण्यासाठी ‘जनता दरबार’ घेण्याचे जाहीर केले. महापौरांच्या जनसंवाद आणि जनता दरबारमध्ये अनुपस्थित असलेल्या संपूर्ण मीडिया आयुक्तांच्या जनता दरबारच्या पहिल्या दिवशी झाडूनपुसून उपस्थित होता. आयुक्तांनी पार्किंगला शिस्त लावली, अशीही बातमी मीडियाने पसरवली. परंतु मुंढे रुजू होण्याच्या १५ दिवसांपूर्वीच महापौर संदीप जोशी यांनी पार्किंग व्यवस्थेला शिस्त लावण्याचे आदेश दिले आणि प्रशासन कामाला लागले होते. आरक्षित पार्किंगचे फलक, सुरक्षा रक्षकांकडून रांगेत गाड्या लावून घेणे हे कार्य सुरू झाले होते.

परंतु मीडियाने हा पराक्रमसुद्धा मुंढे यांच्या नावाने खपविला आणि टीआरपी वाढविली. ‘प्रशासन व्यवस्थेत पारदर्शीपणा आणि सुसूत्रता आणण्यासाठी नव्या जबाबदाऱ्या निश्चित’ अशा बातम्याही मीडियात झळकल्या. या व्यवस्थेत नेमके काय नवे करण्यात आले हे कुठल्यातरी मीडियाच्या प्रतिनिधीला समजले का? ही व्यवस्था पूर्वीपासूनच होती. जी नावे नव्या आदेशात दिली आहे, त्यांच्याकडे त्या जबाबदाऱ्या पूर्वीपासूनच होत्या. त्यानंतर आठवडी बाजारावरील आणि रस्त्यावरील अतिक्रमणाच्या कारवाईला मीडियाने ‘फुटेज’ दिले. जी कारवाई महापौर संदीप जोशी यांनी १ जानेवारीपासून सुरू करण्याचे जाहीर केले होते आणि ती नियमितपणे सुरू होतीच. तिकीट घोटाळा करणाऱ्या २२ वाहकांना निलंबित करण्याचा परिवहन समिती सभापती बाल्या बोरकर यांनी घेतलेला निर्णयसुद्धा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नावाने चिपकविण्यात मीडियाने धन्यता मानली. आता मुख्य मुद्दा १२ फेब्रुवारीच्या भांडेवाडी दौऱ्याचा.

म्हणे, हा दौरा आकस्मिक होता. आतली बातमी ही आहे अर्थात मीडियाच्या भाषेत ‘ऑफ दी रेकॉर्ड’ असे आहे की, ११ तारखेच्या रात्री ८ वाजता या दौऱ्याची आखणी झाली. मीडियात कसे चर्चेत राहायचे हे आयुक्त साहेबांना माहिती असल्याने जनसंपर्क अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा दौरा मीडियाच्या ‘फुटेज’साठी प्लान करण्यात आला. मोजक्या इलेक्ट्रॉनिक मीडियाला याबाबत माहिती देण्यात आली. मीडिया नियोजित वेळी दौरास्थळी पोहचलेला होता. सामान्य नागरिक खूपच भोळा आहे. मीडिया जसे पेरते, ते त्यांच्या डोक्यात बसते. मात्र, तो ही आता सूज्ञ झाला आहे.

हा दौरा इतका आकस्मिक होता तर दौरा सुरू होताच, त्याच्या बातम्या इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि ऑनलाईन मीडियामध्ये कशा सुरू झाल्यात, हा एक मोठ्ठा प्रश्न आहे. तुकाराम मुंढे यांना मुंबईच्या मीडियात ‘फुटेज’ हवे आहे आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाला टीआरपी. केवळ आपल्या बातम्या प्रिंट मीडियात मुंबईत फ्रंट पेजवर येत नाही, म्हणूनच आता आयुक्तांनी इलेक्ट्रॉनिक मीडियाचा सहारा घेतला आहे…..पण जरा तुम्ही शांत बसा….कुणाला सांगू नका कारण हे सुद्धा ‘ऑफ द रेकॉर्ड’ आहे……..