| | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, Oct 19th, 2018

  दीक्षाभूमीला जागतिक दर्जाचे वारसास्थळ बनविण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

  नागपूर येथे दीक्षाभूमीवर आयोजित धम्मचक्र प्रवर्तन सोहळ्यास मान्यवर उपस्थित

  नागपूर : दीक्षाभूमी या पवित्र स्थळाचा विकास करताना जागतिक दर्जाचे वारसास्थळ ठरावे व जगातील अनुयायी येथे यावे यासाठी शंभर कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला असून त्यापैकी 40 कोटी रुपयांच्या पहिल्या टप्प्यातील निधीचा धनादेश देण्यात आला आहे. या पवित्र भूमिच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

  दीक्षाभूमी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती यांच्यावतीने 62 व्या धम्मचक्र प्रवर्तनदिनाच्या मुख्य सोहळ्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

  यावेळी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, महापौर नंदा जिचकार, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, खासदार विकास महात्मे, सर्वश्री आमदार नाना श्यामकुळे, प्रकाश गजभिये, डॉ.मिलिंद माने, कमलताई गवई, भंते नागार्जून सुरई ससाई, सचिव सदानंद फुलझेले, राजेंद्र गवई आदी उपस्थित होते.

  यावेळी दीक्षाभूमीच्या विकास आराखड्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या शंभर कोटींच्या निधीपैकी 40 कोटी रुपयांचा पहिल्या टप्प्यातील निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्मारक समितीला प्रदान करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी व सर्व मान्यवरांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

  मुख्यमंत्री म्हणाले, धम्मचक्र प्रवर्तन दिन सर्वांसाठी प्रेरणादायी असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याच दिवशी लाखो अनुयायांना धम्माचा, अहिंसेचा, पंचशीलाचा मार्ग दाखविला. गौतम बुद्धांनी साऱ्या जगाला आपल्या प्रेमाच्या शक्तीने जिंकले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनीही तथागत गौतम बुद्धांच्या पंचशीलाच्या माध्यमातून शिकवण दिली. धम्मतत्वांच्या आधारावरच भारतीय संविधानाची निर्मिती झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता व बंधुता या शिकवणीचा संविधानामध्ये समावेश केला. आपल्या देशाचे संविधान जगातील सर्वोत्तम संविधान आहे.

  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या माध्यमातूनच देशाने प्रगतीची विविध शिखरे गाठली आहेत. राज्यातील 32 हजार शाळांमध्ये संविधान वाचन सुरु असून यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. संविधानातील मुल्यांची शिकवण प्रत्येक शाळांमधून दिली जात असून या मुल्यांच्या आधाराने अनेक चांगले बदल घडतील. मुंबईतील इंदू मिल येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्यात येत आहे.

  दीक्षाभूमी हे जगाचे वैभव असून जागतिक दर्जाचे वारसास्थळ म्हणून हे विकसित करण्यात येत आहे. दीक्षाभूमी येथील विकास कामांसाठीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यासाठी शंभर कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून त्यापैकी 40 कोटी रुपयांचा पहिला टप्प्यातील निधी वितरीत करण्यात आला आहे. हा विकास आराखडा वेगाने प्रगती पथावर नेण्यासाठी यापुढेही भरीव निधी उपलब्ध करुन दिला जाईल. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच विविध लाभार्थ्यांसाठी विविध विभागांच्या माध्यमातून विकास योजना राबविण्यात येत आहे. देशासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधानच सर्वतोपरी मार्गदर्शक असून या संविधानाच्या आधारावरच देशाची वाटचाल होईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

  केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी म्हणाले, तथागत गौतम बुद्धांचे विचार सर्व जगासाठी मार्गदर्शक असून या विचारांचा अवलंब अनेकांनी केला आहे. गौतम बुद्धांच्या विचारातून आपणही प्रेरणा घेतली पाहिजे. दीक्षाभूमी येथील विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध करण्यात आला असून आराखड्यातील यापुढील कामांसाठीही भरीव निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. केंद्र शासनाच्या माध्यमातून लुंबीनी, गया, सारनाथ, कुशीनगर यासारखी बौद्धस्थळे बुद्धीस्ट सर्कीट अंतर्गत महामार्गांनी जोडण्यात येत आहे. या महामार्गाच्या बांधणीचे काम वेगात सुरु असून याद्वारे परदेशी पर्यटक व लाखो अनुयायांना सुविधा उपलब्ध होणार असल्याचेही श्री. गडकरी यांनी सांगितले.

  केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला सर्वोत्तम असे संविधान दिले. दीक्षाभूमी ही लाखो अनुयायांसाठी प्रेरणास्थान असून मार्गदर्शनाचे विशाल केंद्र आहे. सामाजिक न्याय विभागाअंतर्गत लाभार्थ्यांसाठी विविध लाभदायी निर्णय घेण्यात आले आहे.

  सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले सारे जीवन शोषितांच्या उत्थानासाठी अर्पित केले. राज्यघटनेमध्ये अंतर्भूत असलेल्या समता, बंधुता व स्वातंत्र्य या तत्वाचे पालन आपण सर्वांनी करणे गरजेचे आहे.

  दीक्षाभूमीचा विकास आराखडा तयार करण्यात आला असून यासाठी भरीव निधीही उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या धर्तीवरच इतर स्थळांचा विकास करण्यात येणार आहे. सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून अनुसूचित जातीचे विद्यार्थी व अन्य लाभार्थ्यांना विविध विभागांच्या योजनांचा लाभ पोहचविण्यात येत आहे. त्रिपिटकांचे मराठी भाषांतर करण्यात येणार असल्याचेही श्री.बडोले यांनी सांगितले.

  महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, तथागत गौतम बुद्धांच्या धम्माचे तंतोतंत पालन करणे गरजेचे असून त्यांनी दिलेली ‘अत्त दीप भव’ ही शिकवण आपल्या जीवनात आचरण करावी. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेच्या माध्यमातून दिलेला समतेचा विचारही अनुसरावा.

  स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षाभूमी येथे धम्माची दीक्षा लाखो अनुयायांना दिली. त्यानंतर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यात आले. दीक्षाभूमी सर्वांसाठी प्रेरणास्थान आहे. आभार प्रदर्शन विलास गजघाटे यांनी केले.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145