Published On : Mon, Oct 22nd, 2018

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत श्री रामदेवबाबा अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयाचा पदवीदान समारंभ

ज्ञानाला नैतिकतेचे अधिष्ठान हवे – मुख्यमंत्री

नागपूर : आजच्या झपाट्याने बदलणाऱ्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात विश्वासार्हता अत्यंत महत्त्वाची असून ज्ञानाला नैतिकतेचे अधिष्ठान असणे महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

श्री रामदेवबाबा अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयाच्या द्वितीय पदवीदान समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, ‘इस्त्रो’चे शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. नागराजन वेदाचलम, तंत्र शिक्षण विभागाचे सहसंचालक गुलाबराव ठाकरे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु सिद्धार्थविनायक काणे, प्र.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले, प्राचार्य डॉ.आर.एस.पांडे व प्राध्यापक वृंद उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध शाखांतील विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात क्षणोक्षणी झपाट्याने मोठे बदल घडत असून काही तंत्रज्ञान रातोरात कालबाह्य होत आहे. माहिती व ज्ञान हेच आजच्या युगातील मोठे भांडवल असून विश्वासार्हता जपत नैतिकतेचे अधिष्ठान असलेले ज्ञानच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. केवळ साक्षरता महत्त्वाची नसून कौशल्याधारित ज्ञान आता महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ‘ऑर्टिफिशियल इंटेलिजन्स’ मुळे मोठे बदल घडत असून यामुळे नव्या रोजगार संधीही उपलब्ध होणार आहे. चौथ्या औद्योगिक क्रांतिचे नेतृत्व आपला देश करत असून रोजगाराच्या संधींची क्षेत्रही आता बदलत आहेत. देशात मोठ्या संख्येने तरुण मनुष्यबळ असून हे आपल्यासाठी बलस्थान आहे. आजच्या तरुणांनी नवे तंत्रज्ञान आत्मसात करावे, त्याचा स्वीकार करुन नवी आव्हाने पेलली पाहिजेत. समाजातील दारिद्र्य तसेच आरोग्य व शिक्षण क्षेत्रातील आव्हानांचा सामनाही तंत्रज्ञानाद्वारेच करावा लागेल. आयुष्यातील विविध परीक्षांना व आव्हानांना सामोरे जातांनाच एखाद्यातरी गरजूच्या आयुष्यात हास्य फुलवा, असे भावनिक आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले.


तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित म्हणाले, माहिती तंत्रज्ञानाच्या युगात विविध क्षेत्रातील कौशल्य आत्मसात करतांनाच विद्यार्थ्यांनी संवेदनशीलता जपणेही गरजेचे आहे. विद्यार्थीदशेपासूनच मूल्यांची जपवणूक करत तत्व जोपासा. अन्याय कधीही सहन करु नका. साधेपणाने जीवन जगा. असे आवाहनही श्री.पुरोहित यांनी केले. राज्याने शिक्षण क्षेत्रात मोठी झेप घेतली, असल्याचेही श्री.पुरोहित यांनी सांगितले.

‘इस्त्रो’चे शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ.नागराजन वेदाचलम म्हणाले, श्री.रामदेवबाबा अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयाने राष्ट्रीय स्तरावर मोठी भरारी घेतली आहे. विद्यार्थ्यांनी ज्ञान व कौशल्य आत्मसात करावे. सृजनात्मक शिक्षणावर अधिक भर देण्याची गरज असून देशाला सर्वच क्षेत्रात आघाडीवर नेण्याचे आव्हान विद्यार्थ्यांनी स्विकारावे, असेही श्री.वेदाचलम यांनी सांगितले.

कुलगुरु सिद्धार्थविनायक काणे म्हणाले, आजच्या जागतिकीकरणाच्या युगात अनेक आव्हाने समोर असून पदवी प्राप्त केल्यानंतरच खऱ्या अर्थाने जीवनाला प्रारंभ होतो. ज्ञानी व्यक्ती सर्वत्र पूज्यनीय असून विद्यार्थ्यांनी ज्ञानाची कास धरावी. समाजसेवेकडेही लक्ष द्यावे, असे श्री.काणे यांनी सांगितले.