Published On : Sat, May 12th, 2018

रेल्वेस्थानकावरील सफाई कामगारांत असंतोष

nagpur-railway-station
नागपूर: दोन दिवसांपूर्वीच सफाई कामगारांनी लोहमार्ग पोलिस ठाण्यासमोर कंत्राटदाराचा घेराव केला होता. मार्चच्या वेतनावरून कामगार संतापले होते. आधीच्या कंत्राटदाराकडे दीड महिन्याचे वेतन थकित होते, मध्य रेल्वे प्रशासनाने मध्यस्थी करून त्यांचे वेतन दिले. आता पुन्हा कामगारांवर तशीच स्थिती आली आहे. कारण स्टेशन स्वच्छतेचे कंत्राट आता लखनौ येथील प्राईम क्लिनिंग सर्व्हिसेसला मिळाले. शुक्रवारपासून या नव्या कंत्राटदाराने काम सुरू केले. आता सफाई कामगारांसमोर पुन्हा वेतनाचा प्रश्न उभा झाला आहे.

नागपूर रेल्वेस्थानकाच्या स्वच्छतेचे कंत्राट ज्या कंपनीकडे होते, तोच अर्ध्यावर सोडून गेला होता. १६ फेब्रुवारीनंतर हे कंत्राट (परमनंट व्यवस्था होईपर्यंत) स्थानिक कंत्राटदाराला देण्यात आले होते. १६ फेब्रुवारी ते १० मेपर्यंत म्हणजे पावणेतीन महिने स्थानिक कंत्राटदाराकडे स्टेशनच्या स्वच्छतेची जबाबदारी होती. कामगारांकडून मिळालेल्या माहितीनुसार अर्ध्या कामगारांना मार्चचे अर्धेच वेतन मिळाले. एप्रिलचे वेतन बिल पास झाल्यानंतर मिळेल. अशातच मे महिनाही सुरू झाला.

आधीच्या कंत्राटदाराकडून दीड महिन्याचे थकित वेतन काढण्यासाठी कामगारांना संघर्ष करावा लागला. आता स्थानिक कंत्राटदाराकडे तर मार्च, एप्रिल आणि मे चे १० दिवस असे दोन महिने १० दिवसांचे वेतन आहे. मार्चचे वेतन मिळावे यासाठी दोन दिवसांपूर्वीच कामगारांनी स्थानिक कंत्राटदाराचा घेराव केला होता. लोहमार्ग पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर सोमवारपर्यंत वेतन देण्याचे आश्वासन कंत्राटदाराने दिले होते. मात्र, सोमवार येण्यापूर्वीच स्थानिक कंत्राटदाराचे कंत्राट संपले. त्याच्या ठिकाणी लखनौचे नवीन कंत्राटदार आले आहे. त्यांना पुढील दोन वर्षाकरिता कंत्राट देण्यात आले आहे. त्यामुळे कामगारांसमोर वेतन मिळण्यावरून मोठा प्रश्न निर्माण झाला असून त्याच्यात असंतोष पसरला आहे. यावरून रेल्वेस्थानकावर कधीही कामबंद आंदोलन होऊ शकते.