Published On : Fri, Sep 13th, 2019

सफाई कर्मचाऱ्यांच्या ७५ वारसदरांना नियुक्तीचे आदेश

Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना लाड-पागे समितीच्या शिफारसीनुसार नियुक्ती देण्यात येते. या शिफारसीनुसार सफाई कर्मचाऱ्यांच्या ७५ वारसदारांना नियुक्तीचे आदेशपत्र शुक्रवारी (ता. १३) उपमहापौर दीपराज पार्डीकर यांच्या हस्ते देण्यात आले.

यावेळी स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.सुनील कांबळे, स्वास्थ निरिक्षक रोहिदास राठोड, आरोग्य विभागाचे राजेश हाथीबेड, किशोर मोटघरे, गजानन जाधव, सतीश शिरसवान, सुनील तांबे प्रामुख्याने उपस्थित होते.

लाड-पागे समितीच्या शिफारसीनुसार आतापर्यंत मनपातील सफाई कर्मचाऱ्यांच्या सुमारे ३३०० पेक्षा अधिक वारसदारांना मनपामध्ये नियुक्ती देण्य़ात आलेली आहे. शुक्रवारी ७५ वारसदरांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

दहा जणांना प्रातिनिधिक स्वरूपात उपमहापौर दीपराज पार्डीकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यामध्ये धर्मेंद्र वासनिक, आशिक रासे, धीरज चमके, सुमीत गोडाणे, अविनाश समुद्रे, कुणाल मसारकर, भारत वासनिक, निखिल, मनिष तोमस्कर, अश्विन अनिरूद्ध जांभूळकर यांचा समावेश आहे,

यावेळी बोलताना उपमहापौर म्हणाले, आज आपल्या नागपूर शहराचे नाव देशात सन्मानाने घेतले जाते. नागपूर शहर स्वच्छ व सुंदर होत आहे. अनेक पुरस्कारही या शहराला मिळत आहे. यामध्ये सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान मोठे आहे. आपले शहर स्वच्छ, सुंदर राहावे यासाठी शहरातील घाण साफ करण्याचे मौलिक कार्य हे सफाई कर्मचारी करतात.

त्यामुळे शहराच्या प्रत्येक यशामध्ये या सफाई कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वाची आहे. नवीन नियुक्ती मिळालेल्या सफाई कर्मचाऱ्यांनी देखील आपले काम काळजीपूर्वक व जबाबदारीने करावे, असे आवाहन उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी यावेळी बोलताना केले. कार्यक्रमाचे संचालन राजेश हाथीबेड यांनी केले.