Published On : Thu, Apr 12th, 2018

स्वच्छ परिसर, स्वच्छ हवा आणि शुद्ध पाण्यासाठी घोषणापत्र जारी


नागपूर: स्वच्छ परिसर, स्वच्छ हवा आणि शुद्ध पाण्यासाठी आशियातील सुमारे ३७ शहरांतील महापौरांनी एका ऐतिहासिक घोषणापत्रावर स्वाक्षऱ्या केल्या. इंदौर येथील ब्रिलियंट कन्वेंशन सेंटरच्या ग्रॅण्ड हॉलमध्ये आयोजित संयुक्त राष्ट्रसंघाच्या आठव्या रिजनल थ्री आर फोरम इन एशिया ॲण्ड दी पॅसिफिक या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये इंदौरच्या महापौर मालिनी गौड यांनी सदर घोषणापत्र सादर केले.

सदर घोषणापत्रावर स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये नागपूरच्या महापौर नंदा जिचकार यांचाही समावेश आहे. सन २०३० पर्यंत कचऱ्याच्या समस्येपासून मुक्ती मिळविणे हा या घोषणापत्राचा उद्देश आहे. यासाठी घोषणापत्रानुसार, थ्री आर (रिड्यूज, रिसायकल, रियूज) या त्रिसूत्रीच्या आधारावर आशिया खंडातील सर्व देश एकत्र येऊन काम करतील आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘मिशन झिरो वेस्ट’ यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करतील. या परिषदेत असेही ठरविण्यात आले की संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रत्येक वर्षी होणाऱ्या बैठकीत यावर करण्यात येणाऱ्या कार्याबद्दल सर्व देश आपली भूमिका मांडतील आणि माहिती देतील. विस्तृत चर्चेनंतर सदर घोषणापत्रावर ३७ शहरातील महापौरांनी सहमती दर्शविली. नागपूरच्या महापौर नंदा जिचकार यांच्यासह नागपूर मनपाचे अतिरिक्त उपायुक्त राजेश मोहिते हे सुद्धा परिषदेत सहभागी झाले होते.


घोषणापत्राचा होईल नागपूरलाही फायदा
सदर घोषणापत्र म्हणजे कचरामुक्तीच्या दिशेने टाकलेले सकारात्मक पाऊल आहे. या घोषणापत्रानुसार आता नागपूरमध्ये कचरामुक्तीसाठी, स्वच्छ हवा आणि शुद्ध पाण्यासाठी कार्य केले जाईल. आशिया खंडातील विविध देशांनी घेतलेल्या या पुढाकाराचा फायदा नागपूरला होईल, यात शंका नाही. – नंदा जिचकार, महापौर नागपूर.