| | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, Sep 27th, 2017

  मुस्लिम बोर्डींग निवडणुकीच्या वादातून कोल्हापुरात सशस्त्र हल्ला


  कोल्हापूर: येथील मुस्लिम बोर्डींग निवडणुकीच्या वादातून 30 ते 40 जणांच्या जमावाने रविवार पेठेतील महात गल्ली येथील शौकत बागवान यांच्या घरावर सशस्त्र हल्ला चढवला. घरासह अन्य चार वाहनांची तोडफोड केली. हल्लेखोरांनी मोटारसायकलसह गल्लीतील तरुण मंडळाचे कार्यालय पेटवण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच लक्ष्मीपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. आज दुपारी अचानक घडलेल्या या प्रकारामुळे बिंदू चौक परिसरात तणावाचे वातावरण होते.

  पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, ऐतिहासिक मुस्लिम बोर्डींगची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधकांकडून जोरदार आरोप प्रत्यारोप झाले होते. या निवडणुकीत चेअरमन गणी आजरेकर यांच्या पॅनेलचे समर्थक म्हणून शौकत इकबाल बागवान यांनी निवडणुकीत प्रचार केला होता. रविवार पेठेतील बागवान गल्ली शेजारील महात गल्लीत बागवान राहतात.

  आज दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास 30 ते 40 हल्लेखोर तोंडाला कापड बांधून हातात दगड, काठ्या, इंधनाच्या बाटल्या, शस्त्रे घेऊन बागवान यांच्या घराजवळ आले. त्यांनी बागवान यांच्या घरावर अचानक दगडफेक केली. त्याच्या दर्शनी काचा फोडल्या. यानंतर दारात उभी करण्यात आलेल्या बुलेटवर पेट्रोल टाकून ती पेटवण्यात आली. त्यानंतर अन्य चार मोटारसायकलीची तोडफोड केली. यानंतर हल्लेखोर बागवान यांच्या घरात शिरले. त्यांनी तेथील साहित्य विस्कटले. घरातील महिलांना चाकूचा धाक दाखवला.त्यांच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याचा प्रयत्न केला. तिजोरीतील साहित्य विस्कटले. यानंतर हल्लेखोरांनी येथील “तडाका’ तरुण मंडळाचे कार्यालय पेटवण्याचा प्रयत्न केला. तेथे असणाऱ्या टेंपो रिक्षाची तोडफोड केली.

  या घटनेची माहिती मिळताच लक्ष्मीपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. याठिकाणी स्थिती तणावपूर्ण बनल्याने या ठिकाणी राज्य राखीव दलाची तुकडी पाचारण करण्यात आली. लक्ष्मीपुरी पोलिसात या बाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145