नागपूर : मेयो रुग्णालय परिसरात खासगी रुग्णवाहिका चालविणाऱ्या दोन गटांमध्ये जोरदार वाद होऊन हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी दिवसभर सुरू असलेल्या वादाचे रूपांतर रात्री हिंसक संघर्षात झाले. यावेळी संतप्त गटांनी तीन रुग्णवाहिकांची तोडफोड केल्याची चर्चा असून, या घटनेमुळे मेयो रुग्णालयासमोरील परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मेयो रुग्णालयात दररोज मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येतात. या रुग्णांची दिशाभूल करून त्यांना खासगी रुग्णालयांत नेणारे कथित रॅकेट मेयो आणि मेडिकल परिसरात अनेक वर्षांपासून सक्रिय असल्याची चर्चा आहे. या व्यवस्थेशी संबंधित काही खासगी रुग्णवाहिका चालक रुग्णांना विविध रुग्णालयांत पोहोचविण्याचे काम करतात. रुग्णांना घेऊन जाण्यावरून या चालकांच्या दोन गटांमध्ये वारंवार वाद होत असल्याचे सांगितले जाते.
मंगळवारी सकाळपासूनच दोन्ही गटांत बाचाबाची सुरू होती. त्यानंतर दुपारी वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. रात्री पुन्हा संघर्ष उफाळून आला आणि तीन रुग्णवाहिकांची तोडफोड करण्यात आल्याची माहिती समोर आली. रात्री उशिरापर्यंत परिसरात तणाव कायम होता. मात्र, या घटनेबाबत पोलिसांकडून अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही.


