Published On : Wed, Dec 5th, 2018

नागपुरात बोगस पोलीस कर्मचाऱ्याला नागरिकांनी झोडपले

Representational pic

नागपूर : पोलीस कर्मचारी बनून ड्रंक अ‍ॅन्ड ड्राईव्हच्या नावावर हप्ता वसुली करणाऱ्या बोगस पोलीस कर्मचाऱ्यास नागरिकांनी चोप दिला. ही घटना मंगळवारी रात्री जरीपटका पोलीस ठाणे हद्दीत घडली.

प्रशांत युवराज बांबोर्डे (२६) रा. विश्वासनगर असे आरोपीचे नाव आहे. त्याचा साथीदार राहुल बागडे फरार आहे. भंडारा येथील फिर्यादी २६ वर्षीय रोहित श्यामसुंदर हा रात्री ७.३० वाजता बाईकने नातेवाईकाच्या अंत्यसंस्काराला जात होता. त्याला रस्त्यात आरोपींनी रोखले. गाडीचे दस्तावेज मागितले. नंतर दारु पिऊन गाडी चालवित असल्याचा आरोप करीत कारवाई करण्याची धमकी दिली. त्याला जरीपटका पोलीस ठाणे किंवा वाहतूक विभागाच्या कार्यालयात चलण्यास सांगितले. कारवाई न करण्याच्या मोबदल्यात पाच हजार रुपये मागितले. आरोपी स्वत: दारूच्या नशेत होते.

रोहितला याची कल्पना येताच त्याने वाद न घालता सोडून देण्याची विनंती केली. यावर आरोपीने त्याला थापड मारली. रोहितने आपल्या भावाला फोन करून बोलाविले. त्याचा भाऊ लगेच घटनास्थळी पोहोचला. भावालाही आरोपी दारूच्या नशेत असल्याचे दिसून आले. या दरम्यान लोकांची गर्दी झाली. रोहितच्या भावाने आरोपीला त्यांचे ओळखपत्र मागितले. आरोपी एकमेकांकडे पाहू लागले. लोकांची गर्दी पाहून पळायला लागले.

परंतु लोकांनी प्रशांतला पकडले आणि त्याची धुलाई केली. रोहितने जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्रशांत बांबोर्डेला अटक केली. त्याच्याविरुद्ध यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. तो राहुलसोबत प्रॉपर्टी डीलिंगचे काम करीत होता. दोघांना दारू पिण्यासाठी पैशाची गरज होती. त्यामुळे ते पोलीस कर्मचारी बनून हप्ता वसुली करीत होते.