Published On : Sat, Oct 9th, 2021

सीओसी च्या माध्यमातून शहर नियंत्रणाबाबत नागरिकांनी जाणून घेतली माहिती

नागपूर स्मार्ट सिटीचा उपक्रम : विविध क्षेत्रातील अभ्यागतांनी नोंदविला अभिप्राय

नागपूर : नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपेरेशन सेंटर (सीओसी)मध्ये शहरात लागलेले सीसीटीव्ही कॅमे-यांच्या माध्यमातून वाहतुकीवर नियंत्रण तसेच गुन्हेगारीवर वचक ठेवून शहर कसे नियंत्रित ठेवण्यात येत आहे, याबद्दल शहरातील नागरिकांनी शुक्रवारी (ता.८) माहिती जाणून घेतली.

नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने शहरातील नागरिकांचे विविध गट जसे डॉक्टर्स, वकील, चर्टेड अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी, रिपोर्टर, कॉलेजचे विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांना आमंत्रित करून त्यांना श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपेरेशन सेंटर ची माहिती देण्यात आली.

केंद्र शासनाच्या गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत स्मार्ट सिटीज मिशनतर्फे प्राप्त निर्देशानुसार स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. नागपूर स्मार्ट सिटीतर्फे २७ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबरपर्यंत अमृत महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या दरम्यान नागरिकांना सिटी ऑपेरेशन सेंटरच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या कार्याची माहिती देण्यात आली.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी नागपूर स्मार्ट सिटी तर्फे ‘वाहतुकीपासून स्वातंत्र्य’ आणि ‘गुन्हेगारीपासून स्वातंत्र्य’ या थीमची निवड करण्यात आली होती. इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर अर्थात सिटी ऑपेरेशन सेंटरमध्ये नागरिकांना त्यांच्याद्वारे होणारे वाहतुकीच्यर नियमांचे उल्लंघन आणि अन्य बाबींबाबत इत्यंभूत माहिती देण्यात आली.

विविध क्षेत्रातील सर्व नागरिकांना आयसीसीसी केंद्राची वॉकथ्रू द्वारे माहिती देण्यात आली. त्यानंतर त्यांना आयसीसीसी मॉनिटरिंग स्क्रीन असलेल्या केंद्रामध्ये नेण्यात आले. स्मार्ट सिटीतर्फे देण्यात येणाऱ्या सेवांचे प्रदर्शन जसे एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली, एएनपीआर (ऑटोमॅटिक नंबर प्लेट डिटेक्शन), आरएलव्हीडी (रेड लाइट व्हायोलेशन डिटेक्शन) (वाहतुकीपासून मुक्ती), आर्टीफिसिअल इंटेलिजन्स च्या वापरासह सीसीटीव्ही चा माध्यमातून गुन्हेगारांवर नियंत्रण (गुन्ह्यापासून मुक्ती) वाहनांनवर चालान आदीबाबत माहिती देण्यात आली.

अभ्यागतांना विविध गुन्ह्यांच्या वापर प्रकरणांचे व्हिडिओ सादरीकरण करून दर्शविण्यात आले. रस्ते अपघाताबद्दल माहिती देण्यात आली. भेट दिल्यानंतर अभ्यागतांचे अभिप्राय देखील घेण्यात आले.

स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भूवनेश्वरी एस. यांच्या मार्गदर्शनाखाली आयसीसीसी मधील स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण झाला. त्यांनी सुद्धा अभ्यागतांच्या प्रश्नांचे उत्तर दिले. यावेळी स्मार्ट सिटी ई गव्हर्नन्स विभागाचे महाव्यस्थापक डॉ. शील घुले, अनुप लाहोटी, कुणाल गजभिये, आरती चौधरी आणि आयटी सहाय्यकांची टीम उपस्थित होते.