नागपूर :अजनी पोलीस स्टेशनअंतर्गत धावत्या ऑटोत विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणाऱ्या युवकाला पकडून नागरिकांनी चांगलाच चोप दिल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी तरुणाला अटक करून त्याच्याविरोधात पोलिसांनी विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. कुणाल अनिल लोंदे (वय ३२, रा. विद्यानगर, नंदनवन) असे अटकेतील युवकाचे नाव आहे.
माहितीनुसार, अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारी २० वर्षीय इंजिनियरिंगची विद्यार्थी ऑटोने ती घरी यायला निघाली असता यावेळी कुणालही ऑटोत बसला. त्याने तिची छेड काढली. विद्यार्थिनीने याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर काही दिवसांनी तो पुन्हा ऑटोत बसला व विद्यार्थिनीशी अश्लील चाळे केले. विद्यार्थिनीने नातेवाइकांना माहिती दिली. तो ऑटोत बसल्यास सांग, असे नातेवाईक तिला सांगितले.
शुक्रवारी सायंकाळी विद्यार्थिनी ऑटोने घरी यायला निघाली. कुणालही ऑटोत बसला.
त्याने विद्यार्थिनीची छेड काढायला सुरुवात केली. विद्यार्थिनीने नातेवाइकांना व्हॉट्स ॲपवर माहिती दिली. तिचे नातेवाईक मानेवाडा चौकात पोहोचले. तेथे ऑटो थांबताच नातेवाईक पोहोचले. इतर नागरिकांसह त्यांनी आरोपी कुणालला चांगलाच चोप दिला.त्यानंतर अजनी पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी अटक केली.