File Pic
नागपूर: आई -वडिलांच्या मुलांकडून अपेक्षा असतात. मुलाने योग्य शिक्षण घेवून मोठं व्हावं अशी कुटुंबियांची अपेक्षा असते. त्यासाठी वेळ प्रसंगी मुलांवर रागावतातही. परंतु अलिकडे मुलांना रागावने महागात पडते. असाच काहीसा प्रकार नागपूर रेल्वे स्थानकावर उघडकीस आला. पालकांच्या रागावर एका अल्पवयीन मुलाने घरुन पलायन केले. नागपूर रेल्वे स्थानकात पहाटे २ वाजता आढळला. आरपीएफने चाईल्ड लाईनच्या मदतीने त्याला पालकांच्या सुपूर्द केले.
नागपुरातील राज (काल्पनिक नाव) दहाव्या वर्गात आहे. त्याला नवीन पध्दतीचे हेअर स्टॉईल आवडते. अलिकडेच आलेल्या नव्या हेअर स्टॉईल तो करतो. मात्र, अभ्यासात त्याचे फारसे लक्ष नाही. पालकांनी अभ्यासासाठी त्याला रागावले. तो राग मनात धरून घरी न सांगता तो पळाला. गेल्या दोन दिवसांपासून आई वडिल त्याचा शोध घेत होते. मात्र, तो कुठेच आढळून आला नाही. सोमवारच्या रात्री आरक्षक शशीकांत गजभिये पेट्रोलिंगवर असताना पहाटे २ वाजताच्या सुमारास एक अल्पवयीन बालक त्यांना फलाट क्रमांक एक वर संशयास्पद आढळला. त्याच्या विचित्र हेअर स्टाईलवरुन गजभिये यांनी त्याची विचारपूस केली. वडिल चहा पिण्यास गेले असून मला येथे सोडल्याचे त्याने गजभियेंना सांगितले. मात्र, त्यांचा विश्वास बसला नाही.
खरं तर तो आरपीएफची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत होता. त्यामुळे त्याला चाईल्ड लाईनच्या मदतीने त्याची सखोल चौकशी केली, त्याने दिलेल्या मोबाईल नंबरहून पालकांशी संपर्क साधला. वेळ न घालवता त्याचे वडिल पहाटे ३ च्या सुमारास आरपीएफ ठाण्यात आले. त्यांचाच मुलगा असल्याची खात्री पटल्यानंतर राजला त्याच्या सुपूर्द करण्यात आले.