नागपूर: प्रादेशिक न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेमार्फत होत असलेले काम न्याय दानाच्यादृष्टीने अतिशय महत्वाचे आहे. कायद्याचा जरब गुन्हेंगारांवर बसविण्याकरिता गुन्ह्यांचा तपास व त्याची शास्त्रीय मिमांसा वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे.
यादृष्टीने नागपूर येथील प्रयोग शाळेत वर्षाला सुमारे 40 हजार केसेस हाताळल्या जात असल्याने येथील यंत्रणा व प्रयोगशाळा महत्वाची जबाबदारी पार पाडत आहे. या प्रयोगशाळेच्या सक्षमीकरणासाठी मंत्रालय पातळीवर संबंधित असलेल्या कामांचा आढावा सुजाता सौनिक यांनी प्रयोगशाळेला भेट देऊन घेतला.
प्रयोगशाळेचे उपसंचालक डॉ.व्ही.ज. ठाकरे यांनी प्रयोग शाळेची माहिती देऊन येथे होत असलेल्या विविध तपासण्याची माहिती दिली. दरवर्षाला 40 हजार प्रकरणांमध्ये सुमारे 300 प्रकरणे ही प्राणी व वन्यजीवांची असतात. सायबरच्या केसेस इथे येतात. सर्व प्रकारच्या तपासणीसाठी ही प्रयोगशाळा सक्षम असल्याची माहिती डॉ. ठाकरे यांनी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना दिली.
नागपूर येथून मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन ही संकल्पना विकसित झाली असून आता त्याचा राज्यपातळीवर विस्तार झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष लक्ष देऊन नागपूरसाठी नव्या 5 मोबाइल फॉरेन्सिक व्हॅन उपलब्ध करुन दिल्याची माहिती त्यांनी दिली. मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी सर्व कर्मचाऱ्यांशी चर्चा केली.