Published On : Wed, Jan 2nd, 2019

लष्करप्रमुख विपीन रावत ५ जानेवारीला नागपुरात

Advertisement

नागपूर : भोसला मिलिटरी शाळा नागपूरचा २३ वा वार्षिक उत्सव ५ जानेवारीला सायंकाळी ३.५५ वाजता कस्तूरचंद पार्कवर होणार आहे. वार्षिक परेडला लष्करप्रमुख विपीन रावत मुख्य अतिथी तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असल्याची माहिती सेंट्रल हिंदू मिलिटरी शिक्षण सोसायटी, नाशिकचे (सीएचएमईएस) अध्यक्ष सूर्यरतन डागा यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिली. यावेळी सोसायटीचे सचिव कुमार काळे आणि भोसला मिलिटरी स्कूलचे चेअरमन शैलेश जोगळेकर उपस्थित होते.

डागा म्हणाले, वार्षिक उत्सवात पूर्ण सैनिकी वेशभूषेत औपचारिक परेड हा मुख्य कार्यक्रम आहे. पीटी डिस्प्ले, घोडेस्वार शो, टेंट पेगिग, एरोबेटिक्स (कवायत) व एरो मॉडेलिंग शोचा समावेश आहे. कार्यक्रमाचा शेवट हा शाळेतील पाईप व ड्रम बॅण्डने केलेल्या ‘बिटिंग व रिट्रीज’ने होणार आहे. १५ नोव्हेंबर १९९९ पासून आयोजित वार्षिक उत्सवात भारतीय सशस्त्र दलामध्ये सेवाव्रत अधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात येते. यापूर्वी लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर, अ‍ॅडमिरल आर.के. रावत, एअर मार्शल अजित एस. भोसले, एअर मार्शल एस.बी. देव उपस्थित होते. वार्षिक उत्सवात भोसला मिलिटरी शाळेचे ८५० विद्यार्थी, अन्य शाळांचे दोन हजार विद्यार्थी आणि पालक हजर राहणार आहेत.

डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे यांनी १९३५ मध्ये सेंट्रल हिंदू मिलिटरी शिक्षण सोसायटीची स्थापना नाशिक येथे केली. मुलांना सैनिकी शिक्षण मिळावे म्हणून सन १९३७ मध्ये भोसला मिलिटरी स्कूल नाशिक येथे सुरू केली. नागपूर येथे भोसला मिलिटरी शाळेची सुरुवात जून १९९६ मध्ये ४० विद्यार्थ्यांसह सुरू करण्यात आली. १५ नोव्हेंबर १९९९ मध्ये ३० एकरातील हिरव्यागार परिसरात स्थापना करण्यात आली.

शाळेमध्ये संपूर्ण भारतातील ८५९ विद्यार्थी आहेत. त्यातील ३२९ विद्यार्थी महाराष्ट्र जनजातीय कल्याण विभाग अधीन विदर्भ अध्ययनच्या नक्षल प्रभावित क्षेत्राशी संबंधित आहेत. दोन दशकांच्या प्रवासात मध्यभारताच्या प्रमुख आवासीय संस्थेत स्थानांतरित केले आहे. व्यापक स्वरुपात सैनिकी शिक्षणाचे केंद्र म्हणून मान्यताप्राप्त आहे. शाळेत अभ्यासक्रमासह साहसिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. शाळेय खेळांमध्ये रेकॉर्ड आहेत. जलतरण, बॉक्सिंग, तलवारबाजी व नेमबाजीमध्ये राज्य व राष्ट्रीय स्तरावर स्थान बनविले आहे. शाळेतील पाईप बॅण्डची मध्य भारतातील सर्व शाळांमध्ये प्रशंसा झाली आहे. कार्यक्रमात स्थानिक नागरिक आणि सैन्यातील गणमान्य व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.