Published On : Wed, Dec 18th, 2019

नागपूरच्या हैद्राबाद हाऊस येथील मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष कार्यान्वित मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Advertisement

नागपूर,: विदर्भातील रुग्णांची सोय व्हावी म्हणून नागपूरच्या हैद्राबाद येथील मुख्यमंत्री सचिवालयात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष पुन्हा सुरू करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. मध्यंतरी राष्ट्रपती राजवटीच्या काळात या कक्षाचे कामकाज बंद होते.

इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनपुरे हे या कक्षाचे काम पाहतील. त्यांना सहाय्य करण्यासाठी एक लिपीक देखील देण्यात आला आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षासाठी नागपूर विभागीय आयुक्त, उपसंचालक आरोग्य सेवा आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांची समिती देखील स्थापन करण्यात आली आहे.

या कक्षामध्ये गरजू रुग्णांचे अर्ज स्वीकारण्यात येतील व ही समिती त्या रुग्णांना द्यावयाचे अर्थसहाय्य विहित निकषानुसार निश्चित करणार आहे.

नागपूरच्या मुख्यमंत्री सहायता निधी कक्षास मंत्रालयातील मुख्यमंत्री सहायता निधी कक्षातून रक्कम देण्यात येईल. संबंधित रुग्णास लगतच्या मागील तीन वर्षात आर्थिक मदत मिळाली असल्यास तो नव्याने अर्थसहाय्य मिळण्यास पात्र असणार नाही. या कक्षाचे कामकाज तात्काळ सुरू करण्याचे आदेशही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले आहेत.