Published On : Fri, Jul 6th, 2018

नागपुरात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यासाठी मिशन मोडवर काम करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Advertisement

नागपूर: नागपूर शहरात मुसळधार पावसामुळे सखल भागातील वस्त्यांमध्ये पाणी शिरले असून वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी मिशन मोडवर काम करा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

नागपूर महानगरपालिकेतील सिटी कमांड ॲण्ड कंट्रोल या नियंत्रण कक्षाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी भेट देऊन शहराच्या विविध भागात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती घेतली. स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात सातशे ठिकाणी 3 हजार 800 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून या कॅमेऱ्याद्वारे अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या भागांची पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली. तसेच शहरात सत्तावीस ठिकाणी पावसाचे पाणी साचल्यामुळे अडथळा निर्माण झाला आहे. अशा सर्व ठिकाणी तात्काळ पाण्याचा निचरा करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले.

सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासात नागपूर शहर व ग्रामीण भागात 61.5 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून सकाळी 8 ते दुपारी 2.30 वाजेपर्यंत 263.5 मिलिमीटर पाऊस पडला आहे.

हवामान खात्याने पुढील चोवीस तासात अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे सखल भागात राहणाऱ्या सर्व नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देतानाच अतिवृष्टीमुळे बाधित कुटुंबांसाठी पर्यायी व्यवस्था म्हणून जवळ असलेल्या शाळांमध्ये तात्पुरती व्यवस्था करा. तसेच अतिवृष्टीची परिस्थिती हाताळण्यासाठी एनडीआरएफच्या चमूलाही व्यवस्थेसाठी तैनात करण्याची तयारी ठेवा. अतिवृष्टीमुळे बाधित होणाऱ्या रस्त्यांमध्ये नागरिकांच्या सुविधेसाठी आवश्यक असलेल्या सर्व उपाययोजना करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा चोवीस तास सज्ज ठेवा. कोणत्याही प्रसंगी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण चमू सज्ज राहील अशी दक्षता घ्या. असे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.

शहरातील विविध भागात पावसाचे पाणी शिरले असून अशा वस्त्यांमध्ये महानगरपालिका तसेच जिल्हा प्रशासनातर्फे आवश्यक उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत. यामध्ये अयोध्यानगर, सोमलवाडा, बॅनर्जी ले-आऊट, मानेवाडा, राजीव गांधीनगर, कन्नमवारनगर आदी शहरातील विविध भागांचा यामध्ये समावेश आहे. मोरभवन, सीताबर्डी आदी भागातही पाणी साचल्यामुळे वाहतूक थांबली आहे. नागपूर शहरात सकाळी 8 ते 12 वाजेपर्यंत 160 मिलिमीटर तसेच सीताबर्डी भागात 132 मिलिमीटर, पारडी 62 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

शहरातील सत्तावीस ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला असून यामुळे महाराजबाग ते व्हेरायटी, रविनगर, नरेंद्रनगर पुलाखाली, हॉटेल प्राईड ते विमानतळ, झाशीराणी चौक, अशोक स्तंभ, पांढराबोडी, वाहतूक शाखा, कर्वेनगर, आयटीपार्क तात्याटोपेनगर, सावरकरनगर , नंदनवन, सोनेगाव, पडोळे चौक आदी भागांचा समावेश आहे. नगर प्रशासनातर्फे आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचे महापौर श्रीमती नंदाताई जिचकार यांनी यावेळी सांगितले.

अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थिती हाताळण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर श्रीमती नंदा जिचकार, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस. व्ही. आर. श्रीनिवासन, जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, मनपा आयुक्त विरेंद्र सिंग, स्मार्ट सिटी प्रकल्पाचे सीईओ रामनाथ सोनवणे आदी यावेळी उपस्थित होते.

शहरातील सहा नाले अतिवृष्टीमुळे ओव्हर फ्लो झाल्यामुळे नदीच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरले असून वाहतूक खोळंबली आहे. यामध्ये बेसा, बेलतरोडी, मेडिकल, नारा, रमणा मारोती आदींचा समावेश आहे. या संपूर्ण भागाची पाहणी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली असून नागरिकांच्या सुरक्षतेसाठी तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनाला यावेळी त्यांनी दिल्या.