| | Contact: 8407908145 |
  Published On : Sat, Feb 24th, 2018

  एकात्मिक तिकीट प्रणालीच्या पहिल्या टप्प्याचे काम मार्चपासून सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

  मुंबई : मुंबई महानगर प्रदेशासाठी तयार करण्यात येत असेलल्या एकात्मिक तिकीट प्रणालीच्या कामाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आढावा घेतला. यावेळी या प्रणालीसंदर्भात सादरीकरण करण्यात आले. या प्रणालीच्या पहिल्या टप्प्याचे काम 1 मार्चपासून सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

  मुंबई महानगर प्रदेशातील सर्व सार्वजनिक वाहतूक यंत्रणांसाठी एकच तिकीट व्यवस्थापन प्रणाली असावी. जेणेकरून प्रवाशांना मुंबईतील कुठल्याही सार्वजनिक वाहतूक साधनातून प्रवास करता येईल व वेळ वाचेल, यासाठी एकात्मिक तिकीट प्रणाली (इंटिग्रेटेड तिकिटींग सिस्टीम) तयार करण्यात येत आहे. या प्रणालीचे सादरीकरण आज वर्षा या शासकीय निवासस्थानी करण्यात आले. यावेळी एमएमआरडीएचे महानगर आयुक्त यू. पी. एस. मदान, सहआयुक्त संजय देशमुख, के. विजयालक्ष्मी यांच्यासह रेल्वे, मेट्रो, परिवहन प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते. तिकीट प्रणाली सुरू करण्यासंदर्भात नेमलेल्या पीएमसी या सल्लागार कंपनीचे मनीष अग्रवाल यांनी सादरीकरण केले.

  बेस्ट, रेल्वे, मोनो व मेट्रो, मुंबई तसेच आसपासच्या प्रदेशातील ठाणे, मिरा भाईंदर, नवी मुंबई येथी परिवहन सेवांसाठी एकच तिकीट प्रणाली असणार आहे. ही तिकीट प्रणाली अकाउंटबेस स्मार्ट कार्डच्या रुपात असून त्यामध्ये कुठूनही रिचार्ज करता येणार आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून सार्वजनिक वाहतुकीस चालना मिळणार आहे. या प्रणालीच्या कार्यचालनासाठी विशेष उद्देश वहन कंपनी स्थापन करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात बेस्ट, मोनोरेल व रेल्वेसाठी ही तिकीट प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात नवीन मेट्रो लाईन, इतर सार्वजनिक वाहतूक सेवांचा समावेश होणार असून याबरोबरच नंतर वाहनतळ, टोल, टॅक्सी, रिक्षा यांचाही समावेश या प्रणालीत करण्यात येणार आहे.

  मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, प्रवाशांच्या सोयीसाठी ही तिकीट प्रणाली उपयुक्त असून यामुळे वेळ व पैसा वाचणार आहे. या प्रणालीचे काम लवकरात लवकर सुरू करावे. तसेच फक्त मुंबई महानगरापुरतेच स्मार्ट कार्ड न ठेवता राज्यातील कुठल्याही शहरात सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी वापरता येण्याजोगी व्यवस्था करावी.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145