Published On : Mon, Feb 5th, 2018

सूत गिरण्यांना कमी दराने वीज उपलब्ध करून देण्यासाठी समिती स्थापन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Advertisement

मुंबई : वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी सूत गिरण्यांना सध्याच्या दरापेक्षा कमी दराने वीज उपलब्ध करून द्यावी. यासाठी महाऊर्जा व वस्त्रोद्योग संचालक यांच्या समन्वयाने समिती स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वस्त्रोद्योग विभागाच्या बैठकीत दिले. यावेळी वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख उपस्थित होते.

वस्त्रोद्योग विभागातर्फे सचिव वस्त्रोद्योग अतुल पाटणे यांनी यावेळी विस्तृत सादरीकरण केले.

राज्यात १३२ सूत गिरण्या असून वस्त्रोद्योगाचा मुख्य घटक असलेल्या सूत गिरण्यांना कमी दराने वीज उपलब्ध करून दिल्यास त्या अधिक सक्षमपणे चालू शकतात. पारंपरिक ऊर्जेसोबतच सौर उर्जा व अन्य स्त्रोतांद्वारे वीज उपलब्ध्‍ा करून देण्यासंदर्भात समितीने अहवाल सादर करावा. सूत गिरण्या, साखर उद्योग, रेशीम विकास यांना लागणारे कुशल व तांत्रिक प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध्‍ा करून देण्यासाठी स्वतंत्र संवर्ग तयार करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी वस्त्रोद्योग विभागाला दिले.

कापूस उत्पादक जिल्ह्यांतच वस्त्रोद्योग वाढीला प्रोत्साहन देण्यात यावे. तसेच पारंपरिक धागा निर्मितीसोबतच अंबाडी, केळी, बांबू यापासून तयार होणाऱ्या धागा निर्मिती संदर्भातही संशोधन करण्यात यावे. तसेच टेक्स्टाईल युनिव्हर्सिटीबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.

यावेळी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डी. के. जैन, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव प्रविणसिंह परदेशी, उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव अरविंद सिंह उपस्थित होते.