Published On : Tue, May 15th, 2018

मुख्यमंत्रिपदावर राज्यात फार काळ राहता येत नाही

Advertisement

मुंबई : मुख्यमंत्रिपदावर महाराष्ट्रात फार काळ राहता येत नाही हा इतिहास आहे, एखाद्या प्रकल्पाचे भूमिपूजन ज्यांच्या हस्ते होते, त्यांना उद्घाटनाच्या कार्यक्रमाला येता येत नाही. पण मला भूमिपूजन आणि उद्घाटनालाही येता आले, असे सूचक वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विक्रोळी, कन्नमवार नगर येथील ‘शुश्रुषा’च्या सुमनरमेश तुलसियानी रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना केले. विक्रोळीतील शुश्रुषाच्या या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे उद्घाटन सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. या रुग्णालयाचे बांधकाम लवकर झाले की, मी जास्त काळ या पदावर राहिलो हे कळत नाही, असेही ते यावेळी म्हणाले.

या उद्घाटनप्रसंगी उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, शिक्षणमंत्री विनोद तावडे, आरोग्यमंत्री दीपक सावंत, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता तसेच मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर उपस्थित होते. ‘आरोग्य क्षेत्र हे सेवेचे क्षेत्र आहे, या क्षेत्रात नफा न कमावता सेवाभाव मनात ठेवून कार्यरत असणे महत्त्वाचे आहे. आरोग्य क्षेत्रामध्ये वैद्यकीय सेवांचे दर वाढले आहेत. त्यामुळे हा खर्च कमी करण्याच्या दृष्टीने सरकारच्या माध्यमातून विमा कवच उपलब्ध करून देण्यात आले आहे,’ असे फडणवीस यांनी सांगितले.

शुश्रुषा सिटिझन्स को-ऑपरेटिव्ह रुग्णालयाचे अध्यक्ष आणि सल्लागार डॉ. नंदकिशोर एस. लाड यांनी अद्ययावत तंत्रज्ञानाआधारे रुग्णसेवा देऊ, असे यावेळी स्पष्ट केले.