मुख्यमंत्र्यांनी कोकण वासीयांचा विश्वासघात केला – विखे पाटील

नागपूर : आज सलग दुसऱ्या दिवशीही कोकणात प्रस्तावित असलेल्या नाणार प्रकल्पाच्या मुद्द्यावरून भाजपा आणि शिवसेनेमध्ये विधानसभेच्या सभागृहात खडाजंगी उडाली. नाणार प्रकल्पाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदनाच्या माध्यमातून हा प्रकल्प लादला जाणार नाही असले सभागृहात सांगितले. मात्र त्यांनी केलेल्या निवेदनानंतर विरोधी पक्षांनी मुख्यमंत्र्यांवरच आरोप केला आहे. मुख्यमंत्र्यांनी कोकण वासीयांचा विश्वासघात केला असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलतांना विखे पाटील म्हणाले की, एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात की, नाणार प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध असेल तर तो लादला जाणार नाही. तर दुसरीकडे केंद्रातील भाजपाचे सरकार विदेशी कंपन्यांसोबत करार करत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कोकण वासीयांच्या डोळ्यात धूळफेक करतायेत हे उघड झाले आहे. जर मुख्यमंत्र्यांना स्थानिकांशी चर्चा करायची होती तर करार का करण्यात आले असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.