Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Thu, Aug 30th, 2018

  गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी प्रशासनाशी समन्वय राखण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

  मुंबई : न्यायालयाच्या आदेशाच्या अधीन राहून राज्यातील गणेशोत्सव उत्साहात व आनंदात साजरा करण्यासाठी प्रशासन व गणेश मंडळांनी उत्तम समन्वय राखावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

  गणेशोत्सवाच्या आयोजनासंदर्भात आज मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात प्रशासन व समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.

  त्यावेळी त्यांनी सूचना दिल्या. मुंबई शहराचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर, बृहन्मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, आमदार आशिष शेलार, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता, पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, मुंबई पोलीस आयुक्त सुबोध जयस्वाल, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेंद्र दहीबावकर, प्रमुख कार्यवाह गिरीश वालावलकर, सार्वजनिक गणेशोत्सव महासंघाचे अध्यक्ष जयेंद्र साळगावकर आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने तयार केलेल्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले.

  मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, मुंबईतील गणेशोत्सव हा जागतिक आकर्षणाचे केंद्र आहे. येथील गणेशोत्सव पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात परदेशी पर्यटक येत असतात. त्यामुळे हा अतिशय उत्सव आनंदात साजरा होण्यासाठी व गणेश मंडळाच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन व मंडळांनी समन्वय साधावा. पोलीस व प्रशासनाने न्यायालयाच्या आदेशानुसार योग्य ती अंमलबजावणी करावी. समन्वय समितीच्या मागण्यासंदर्भात प्रशासनास योग्य ते निर्देश देण्यात आले आहेत.

  मुंबईतील गणेशोत्सव मंडळांना ऑनलाईन परवाने देण्यात येत आहेत. यावर्षी कागदपत्रे जमा केल्यानंतर व ऑनलाईन माहिती भरल्यानंतर पुढील वर्षी पुन्हा कागदपत्रे देण्याची आवश्यकता भासणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145