
मुंबई : नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील चिचोली (खापरखेडा) येथे नवे अपर तहसीलदार कार्यालय कार्यान्वित करण्यास आणि त्यासाठी आवश्यक बाबींना महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने मान्यता दिली आहे. शासकीय कामकाजाचा वाढता व्याप, उपलब्ध अपुरा अधिकारी व कर्मचारीवृंद, भौगोलिक स्थान, वाढती लोकसंख्या आणि नागरीकरण विचारात घेऊन प्रशासन लोकाभिमुख व गतिमान करण्यासाठी तसेच नागरिकांना विविध सेवा सहज व जवळ उपलब्ध करून देण्यासाठी महसूलमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला.
नव्या शासन निर्णयानुसार, चिचोली (खापरखेडा) अपर तहसीलदार कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात ‘चिचोली (खापरखेडा)’ या एका महसूल मंडळाचा समावेश राहील. तर सावनेर तहसीलदार कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात सावनेर, खापा, केळवद, बडेगाव आणि पाटणसावंगी अशी एकूण पाच महसूल मंडळे कायम राहतील.
नव्या अपर तहसीलदार कार्यालयाचे कामकाज कार्यान्वित झाल्यानंतर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ अन्वये असलेले सर्व अधिकार व कर्तव्ये नेमून दिलेल्या क्षेत्रासाठी वापरण्यात येतील. महसूली कामकाजाव्यतिरिक्त इतर बाबींचे अधिकार संपूर्ण तालुक्यासाठी मूळ तहसील कार्यालयाकडेच राहतील. निवडणूक, संजय गांधी निराधार योजना व इतर महसूलेतर कामकाजाबाबतचे अर्ज किंवा निवेदने प्राप्त झाल्यास ती स्वीकारून पुढील कार्यवाहीसाठी तहसीलदार कार्यालयाकडे पाठविण्याची तरतूद करण्यात आली आहे. अपर तहसीलदार, चिचोली (खापरखेडा) यांचे प्रतिवेदन अधिकारी म्हणून संबंधित उपविभागीय अधिकारी आणि नियंत्रक अधिकारी म्हणून नागपूरचे जिल्हाधिकारी काम पाहतील, तसेच अपर तहसीलदार हे कार्यालय प्रमुख असतील.



