
नागपूर– आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर यांनी अमेरिकेतील बोस्टन येथे भारतीय आहारसंस्कृतीचा प्रभावी प्रचार करत ‘आहार क्रांती’चा संदेश जागतिक स्तरावर पोहोचवला.आयुर्वेदावर आधारित विशेष महोत्सवात सहभागी होत त्यांनी पाश्चात्य देशांतील नागरिकांसमोर भारतीय मसाल्यांचे वैज्ञानिक महत्त्व आणि सात्विक आहारशैलीचे फायदे सविस्तर मांडले. या उपक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.
“आपण जे अन्न खातो, त्याचा परिणाम केवळ शरीरावरच नाही तर मन आणि विचारांवरही होतो. त्यामुळे ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ मानून त्याचा औषधाप्रमाणे उपयोग केला, तर निरोगी आणि समाधानी जीवन जगता येते,” असे प्रतिपादन विष्णू मनोहर यांनी केले. त्यांच्या हस्ते तयार करण्यात आलेल्या सात्विक पदार्थांच्या सुगंधाने आणि चवीने उपस्थित भारतीयांसह परदेशी नागरिकही प्रभावित झाले.
या महोत्सवात आयुर्वेदातील पंचकर्म उपचारपद्धती आणि योगसाधनेचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. तसेच, नऊवारी साडी आणि पारंपरिक दागिन्यांनी सजलेल्या मराठी महिलांनी बोस्टनच्या रस्त्यांवर सांस्कृतिक मिरवणूक काढत मराठी परंपरेचा दिमाखदार जागर केला.पंतप्रधान मोदी यांनी मांडलेल्या ‘आहार क्रांती’ संकल्पनेला जागतिक व्यासपीठ मिळवून देण्याचे काम या उपक्रमातून झाले.
परदेशात राहूनही आपली संस्कृती जपणाऱ्या मराठी बांधवांच्या सहभागामुळे अमेरिकेच्या भूमीवर भारतीय अस्मितेचा ठसा अधिक ठळकपणे उमटल्याचे विष्णू मनोहर यांनी नमूद केले.








