Published On : Fri, Apr 30th, 2021

प्राथमिक लक्षणे जाणवताच कोविड तपासणी करून घ्या !

उपविभागीय अधिकाऱ्यांचे आवाहन : संसर्गाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी प्रत्येकाची जबाबदारी

भंडारा:- दुखणे अंगावर काढणे आणि कोरोना चाचणीस केलेला विलंब अनेकांसाठी धोकादायक ठरू शकतो. स्वतःसोबतच कुटूंबीयही धोक्यात येऊ शकतात. त्यामुळे प्राथमिक लक्षणे जाणवताच कोविड तपासणी करून घ्यावी, कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे आवाहन तुमसरचे उपविभागीय अधिकारी नितीन सदगीर यांनी केले आहे.

Gold Rate
27 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,14,100 /-
Gold 22 KT ₹ 1,06,100 /-
Silver/Kg ₹ 1,43,400/-
Platinum ₹ 49,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

तुमसर शहर आणि परिसरात बरेचसे रुग्ण त्रास वाढू लागल्यानंतर दवाखान्यात पोहचतात. उपचारास विलंब झाल्यामुळे अनेकांची प्रकृती ढासळते. काही ठिकाणी रुग्ण अत्यवस्थ होण्याचे प्रमाण वाढत आहे. परिणामी, उपलब्ध सुविधा व त्यासाठी होणारी धावपळ टाळण्यासाठी नागरिकांनी थोडे जरी लक्षणे जाणवले तरी ताबडतोब आपल्याला सोयीचे सामान्य रुग्णालयात किंवा जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड चाचणी करून घ्यावी, असे आवाहनही उपविभागीय अधिकाऱ्यांनी केले आहे. सध्याचा काळ खूप खडतर असून, बेरोजगार कुटुंब व आपल्या आजूबाजूच्या परिसरातील गरीब व वयस्कर निराधार कुटुंबीयांना मदतीसाठी समाजसेवी नागरिकांनी मदतीचा हात देण्यासाठी पुढाकार घ्यावा, परवानगीमध्ये घालून दिलेल्या नियमांचे पालन करून दंडात्मक कार्यवाही टाळावी.

जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरू ठेवण्यासाठी मुभा आहे. मात्र, या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत मालकांनी दर 15 दिवसाला कोरोना चाचणी करणे अनिवार्य आहे. तसेच लग्न समारंभासाठी तहसीलदार यांची परवानगी आवश्यक आहे. लग्न 25 व्यक्तींच्या मर्यादेमध्ये व 2 तासात पूर्ण करावेत. अवाजवी मोठे कार्यक्रम टाळावे. प्रशासनाचे सर्व लग्नसमारंभावर लक्ष आहे.

लवकर उपचार केल्यास, रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. वेळीच निदान आणि उपचार केल्यास स्वतःसह कुटुंबातील आणि संपर्कातील व्यक्तींमध्ये कोविड संक्रमणाचा प्रादूर्भाव टळू शकतो. सामाजिक दायित्व म्हणून कोरोना कुटुंबातील सदस्य अथवा नातेवाईकांचीही तत्काळ कोरोना तपासणी करावी. कोरोना संक्रमण आढळून आल्यास तत्काळ औषधोपचार करावेत. संभाव्य हानी आणि कोरोना संक्रमण टाळण्यासाठी प्रत्येकाने सतर्क राहावे, असे आवाहन सदगीर यांनी केले आहे.

Advertisement
Advertisement