Published On : Thu, Apr 15th, 2021

कोरोनाची लक्षणे आढळताक्षणी वेळ न घालवता तात्काळ तपासणी करा

·कोविड टास्क फोर्सच्या सूचना
·अनलॉकच्या निर्बंधामध्येही लसीकरणाला प्राधान्य
·दोन लाखापेक्षाही जास्त लसीकरणाचे डोस उपलब्ध
·रेमडेसीव्हीरचा वापर काळजीपूर्वक आवश्यक
·जनतेने घाबरुन न जाता प्रशासनाला सहकार्य करावे

नागपूर: कोरोनाची परिस्थिती हाताळण्याला प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. जिल्हा प्रशासन व महानगरपालिकेतर्फे बाधित रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यकतेनुसार बेडच्या उपलब्धतेसाठी शासकीय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये व्यवस्था करण्यात येत आहे. ऑक्सिजनचा साठा उपलब्ध करण्यासाठी भोपाळ, भिलाई तसेच इतर ठिकाणाहूनही प्रयत्न सुरु आहेत. जनतेने घाबरुन जाऊ नये व उपचाराला सहाकार्य करावे, असे आवाहन कोविड टास्क फोर्सच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी आज जनतेला केले आहे.

Gold Rate
18 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,28,500 /-
Gold 22 KT ₹ 1,19,500 /-
Silver/Kg ₹ 1,70,500/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या उपस्थितीत विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, कोविड टास्क फोर्सचे सदस्य, तज्ज्ञ डॉक्टर व माध्यम प्रतिनिधी यांच्यासोबत वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. या संवादामध्ये कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. मिलिंद भ्रुशुंडी, डॉ. राजन बारोकर, डॉ. राजेश गोसावी व डॉ. निर्मल जयस्वाल सहभागी झाले होते.

कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर रुग्णसंख्या सातत्याने मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे शहरातील व जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण निर्माण होत आहे. कोरोनाबाधित रुग्णांसाठी बेडची उपलब्धता, ऑक्सिजन तसेच रेमडेसिव्हीरसारख्या औषधांचा मर्यादित पुरवठा होत असल्यामुळे जनतेमध्ये काळजीचे वातावरण निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर टास्क फोर्सच्या सदस्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला आहे.

कोरोनाबाधित रुग्णांचे प्राण वाचविण्याला प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. बाधित रुग्णांवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करण्यात येतात. उपचार करताना रुग्णांना केवळ रेमडिसीव्हीर इंजेक्शन देण्याचा आग्रह होत आहे. हा अत्यंत चुकीचा असून, सर्वांनाच याची आवश्यकता नाही. इंजेक्शन उपलब्ध नसल्यामुळे नातेवाईक व जनतेमध्ये निर्माण झालेला गैरसमज दूर होणे आवश्यक आहे. त्यामुळे या एकाच इंजेक्शनचा आग्रह न धरता कोविडच्या प्रोटोकॉलनुसार औषधोपचाराला प्राधान्य देण्यात येत असल्याचे टास्क फोर्सचे डॉ. मिलिंद भ्रुशुंडी यांनी यावेळी सांगितले.

कोविड रुग्णांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय, एम्स यासह इतर खासगी रुग्णालयांमध्ये बेडची सुविधा वाढविण्यात येत आहे. रुग्णांना बेड उपलब्ध व्हावेत, यासाठी उपलब्ध बेडचे नियोजन करण्यात येत आहे. खासगी रुग्णालयांनासुद्धा कोविड रुग्णालयामध्ये मान्यता देण्यात येत असल्याचे यावेळी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले.

कोरोना संसर्ग रुग्णांची संख्या झोपडपट्टी व इतर भागातही वाढत असल्यामुळे अशा भागांमध्ये ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रिटमेंटला प्राधान्य देण्यात आले आहे. जनतेने लसीकरण मोहिमेत सहभागी होऊन 45 वर्षांवरील सर्वांनी लस घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री डॉ. राऊत यांनी केले. लसीकरणासाठी दोन लाख डोस प्राप्त झाले असल्याने सर्वच केंद्रांवर लसीकरण सुरु आहे. अनलॉक प्रक्रियेमुळे प्रतिबंध असले तरीही लसीकरणासाठी जनतेने लसीकरण केंद्रावर जाण्यासाठी कोणतेही निर्बंध नाहीत.

कोरोनासंदर्भात लक्षणे आढळून आल्याबरोबर तात्काळ तपासणी करा. यासाठी घरी वेळ घालवू नका, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. गृहविलगीकरणात असलेल्या नागरिकांनी बाहेर फिरु नये, त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. गृहविलगीकरणातील रुग्ण बाहेर आढळून आल्यास त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्री डॉ. राऊत यांनी दिलेत.

Advertisement
Advertisement