Published On : Wed, Aug 18th, 2021

नागरिकांकडून नाममात्र पार्किंग शुल्क आकारुन

वाहनतळाची व्यवस्था उपलब्ध करण्यासाठी महापौर प्रयत्नशील

नागपूर: शहरात सध्या परिस्थितीत पार्किंगची मोठी समस्या निर्माण झाली आहे. वाहनचालक कुठे ही आपले वाहन पार्क करतात त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. नागपूर महानगरपालिका व वाहतुक पोलिस विभागाव्दारे निर्धारीत केलेल्या वाहनतळावर वाहनचालक पार्किंग करत नाही. या गंभीर समस्येवर उपाय करण्यासाठी महापौर दयाशंकर तिवारी यांनी नाममात्र शुल्क घेऊन डिजीटल प्रणाली व्दारे नागरिकांना पार्किंगची व्यवस्था उपलब्ध करण्याचे निर्देश दिले आहे.

सध्या परिस्थितीत नागपूर शहरात १४ लक्ष दुचाकी वाहन आणि २.५० लक्ष पेक्षा जास्त चार चाकी वाहन मिळून १८ लक्ष वाहने नोंदणीकृत आहेत. वाहने जर निर्धारित पार्किंग भागात लागली तर वाहतुकीस अडथळा होणार नाही आणि मनपाला सुध्दा यातून उत्पन्न प्राप्त होईल.

महापौरांच्या सभाकक्षात बिग वी चे कंपनी डायरेक्टर किशोर डागा यांनी सादरीकरण करुन नाममात्र पार्किंग शुल्कात पार्किंगची उत्तम व्यवस्था करण्यासंबंधी सादरीकरण केले. त्यांनी सांगितले की, क्यू आर कोडच्या माध्यमातून डिजीटल पध्दतीने पार्किंग शुल्क नागरिकांकडून घेतले जाईल. वाहनचालकाकडून नाममात्र शुल्कात पार्किंग सुविधा देण्यावर भर राहील. बाजारपेठेत व रस्त्यांवर चे पार्किंग या मधून सुरळीत होईल आणि मनपाला उत्पन्न प्राप्त होईल. प्रत्येक महिन्याला वाहन चालकाला आपले वाहनाचे पार्किंग शुल्क रिचार्ज करावे लागेल.यावर नियंत्रण ठेवणारे व्हीजीलंस स्कॉड राहील, अशा पध्दपतीने ही प्रणाली कार्य करेल.

महापौरांनी कंपनीच्या डायरेक्टरला सात दिवसाचा आत वित्तीय आराखडयासह प्रस्ताव देण्याची सूचना केली. त्यांनी सांगितले की पार्किंगची संपूर्ण जबाबदारी कंपनीची असावी. मासिक शुल्क घेतल्यानंतर वाहन चालकाला मनपाव्दारे शहरातील निर्धारित जागांवर पार्किंग करण्याची मुभा राहील. याव्दारे नागपूर शहरात नागरिकांना स्वस्त दरात पार्किंगची सुविधा उपलब्ध होईल तसेच अवैधरित्या पार्किंग करणा-यांवर मनपा व वाहतुक पोलिस तर्फे कारवाई केली जाईल. कॅशलेस पार्किंगमुळे डिजीटल चालनाला प्रोत्साहन मिळेल. तीन तासापेक्षा जास्त वेळ पार्किंग केली तर अधिकचे शुल्क दयावे लागणार आहे.

बैठकीत उपायुक्त विजय देशमुख, वाहतुक अभियंता श्रीकांत देशपांडे, स्मार्ट सिटीचे महाव्यवस्थापक डॉ. शील घुले, महामेट्रोचे महेश गुप्ता, उप अभियंता सुधीर माटे उपस्थित होते.