मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीचं मतदान संपताच आता महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने मोठा निर्णय घेत, मंत्री आणि माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर राज्यातील आगामी निवडणुकांसाठी प्रभारी पदाची जबाबदारी सोपवली आहे.
भाजपच्या या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. बावनकुळे यांचा संघटनात्मक अनुभव आणि कार्यशैली पाहता पक्षाला या निर्णयाचा फायदा होणार असल्याचं मानलं जात आहे.
या निर्णयाची माहिती स्वतः बावनकुळे यांनी माध्यमांना दिली. त्यांनी सांगितले,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी माझ्यावर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रभारी पदाची जबाबदारी दिली आहे. या निवडणुकीत मी संघटन आणि महायुतीच्या सर्व टीमसोबत समन्वय साधून काम करणार आहे.
ते पुढे म्हणाले,महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी आम्ही एकत्रितपणे काम करू. महायुतीच्या बळावर या सर्व निवडणुकांमध्ये विजय मिळवू, असा मला पूर्ण विश्वास आहे.”
बावनकुळे यांनी पुढे सांगितले की,मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ही जबाबदारी देण्यात आली असून, महाराष्ट्रात महायुती दोन तृतीयांश बहुमताने सर्व निवडणुका जिंकेल,” असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.
भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर सोपवण्यात आलेली ही जबाबदारी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाची आणि रणनीतिक पाऊल मानली जात आहे.











