मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला पाठींबा जाहीर केला. यामुळे महायुतीची ताकद वाढणार आहे.यातच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली.
या भेटीनंतर बावनकुळे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबईत प्रचारसभा होणार आहे. १७ तारखेला दादरच्या शिवाजी पार्कवर महायुतीची रॅली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी या सभेला संबोधित करतील.त्यासाठी मी स्वत: राज ठाकरेंना निमंत्रित करण्यासाठी आलो आहे. राज ठाकरेंनी निमंत्रण स्वीकारले. मोदींच्या विकसित भारताच्या संकल्पनेला राज ठाकरेंनी साथ दिली. मुंबईच्या निवडणुकीत राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची आहे.
राज ठाकरेंच्या पाठिंब्यामुळे महायुतीची ताकद वाढली असून याचा आम्हाला मोठा फायदा मिळणार असल्याचे बावनकुळे म्हणाले. मुंबईतील घाटकोपर येथील दुर्घटना दुर्दवी असून दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच पंतप्रधान मोदींचा दौरा हा पूर्वनियोजित होता. या घटनेची संवेदना सगळ्यांना आहे, असा पलटवारही बावनकुळे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर केला.