नागपूर – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे वादग्रस्त कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांना राज्यपाल आणि कुलपती रमेश बैस यांनी निलंबित केले आहे.बाविस्कर समितीच्या अहवालानुसार ही कारवाई करण्यात आली असून यासंदर्भातील अधिकृत पत्र राज्यपाल कार्यालयातून विद्यापीठाच्या सामान्य प्रशासन विभागाला पाठविण्यात आले.
सध्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा कार्यभार गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.यासंदर्भात कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांनी दुजोरा दिला आहे.
हे आहे निलंबनाचे कारण –
नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या विरोधात झालेल्या तक्रारींच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या उच्च तंत्र शिक्षण विभागाचे उपसचिव अजित बाविस्कर यांच्या समितीने डॉ. चौधरी यांना दोषी ठरवले होते. परीक्षेच्या कामात महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादितची (एमकेसीएल) निवड आणि विनानिविदा बांधकांचे कंत्राट देण्यात आल्याचे निष्कर्ष समितीने सादर केलेल्या अहवालात नमूद केले आहे.
विद्यापीठाच्या विकास कामांच्या दरम्यान फेरफार करण्यात आल्याचा आरोपही त्यांच्यावर होता. या कामांचे कंत्राट न काढता एकाच व्यक्तिला कामे देण्यात आल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधिक्षक अभियंता यांनी आपल्या अहवालात ही सर्व कामे निविदा कार्यवाही न करता केली असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.हा संपूर्ण अहवाल राज्य शासनाने कुलपतींना पाठवला होता. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.